दक्षिण मुंबईत तसेच चुनाभट्टी भागांत वसलेल्या बंजारा समाजात अद्यापही लसीकरणाबाबत फारशी जनजागृती दिसून आलेली नाही. चुनाभट्टी येथे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण राबवण्यासाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांना थेट हाकलवून लावण्याचा प्रकार घडला. सुरक्षिततेच्या कारणास्तव या भागांत पोलिसांची मदत घेऊन सर्व्हेक्षण करावे लागले.
चुनाभट्टी येथील रेल्वे स्थानकाजवळ कच्च्या घरांत राहणा-या बंजारा समाजात निरक्षरतेचे प्रमाण असल्याने लसीकरण तसेच गोवरबाबत फारशी जागृती नाही आहे. अधिकारी दिसताच क्षणी त्यांची भेट नाकारणे, मुलांना पळवून लावणे हा प्रकार तिथे सुरु आहे. त्यामुळे सुरक्षिततेची सर्व काळजी घेत या मुलांना शोधण्याचे काम आरोग्यसेविका आणि आरोग्य अधिका-यांनी सुरु केली आहे.
(हेही वाचा प्रशांत दामले यांच्यासह आरती अंकलीकर टिकेकर, मीना नाईक यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर)
सरकारच्यावतीने कोणतीच लसीकरण मोहिम राबवली गेली नाही
दुसरीकडे बंजारा समाजाची तब्बल ७० वर्षे जुनी वस्ती असलेल्या कुलाब्यातील आंबेडकरनगरमध्येही तीन गोवरचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ८ वर्षांची मुलगी, ४ वर्षांचा मुलगा आणि १० महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. यापैकी केवळ ४ वर्षांच्या मुलाचे गोवर तसेच इतर लसीकरण झालेले नाही. तिघांनाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाला डिस्चार्ज मिळाल्याचे समजते. आंबेडकरमधील बंजारा समाजातील प्रतिनिधींनी या भागांत अद्यापही सरकारच्यावतीने कोणतीच लसीकरण मोहिम राबवली गेली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. आंबेडकर ही वस्ती लसीकरणापासून कायमच वंचित राहिली आहे. या भागांत दैनंदिन रोजंदारीवर राहणारी मोठी वसाहत आहे. मात्र त्यांना लसीकरण तसेच आरोग्याविषयक जनजागृतीपर माहिती द्यायला सरकारी अधिकारी फारसे येत नाही, असेही सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community