‘श्रद्धाच्या पत्राची तेव्हाच दखल घेतली असती तर…’, फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

182

श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. श्रद्धाचा मारेकरी असलेल्या आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीला दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, 2020 मध्ये श्रद्धाने पोलिसांना पत्र लिहून आपल्याला वाचवण्याची मागणी केली होती.

त्यामुळे त्या पत्राची गंभीर दखल जर पोलिसांकडून घेण्यात आली असती तर आज श्रद्धाचे प्राण वाचले असते, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. पत्रावर कारवाई का करण्यात आली नाही, याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

(हेही वाचाः आई गेल्यानंतर एकट्या पडलेल्या श्रद्धाचा आफताबने घेतला गैरफायदा आणि…)

फडणवीसांचे चौकशीचे आदेश

श्रद्धाने पोलिसांना लिहिलेले पत्र माझ्याकडे आले असून मी ते वाचले आहे. ते पत्र फार गंभीर आहे. या पत्राची गंभीर दखल त्यावेळीच घेऊन कारवाई का करण्यात आली नाही, याची चौकशी होणार आहे. मला कोणावरही दोषारोप करायचे नाहीत. पण अशा पत्रांची वेळी दखल घेतली नाही तर अशा घटना घडतात. जर कारवाई झाली असती तर कदाचित श्रद्धाचे प्राण वाचले असते, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

श्रद्धाने केली होती तक्रार

2019 मध्ये श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांच्या नात्याला सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच आफताब श्रद्धाचा छळ करत होता आणि तिला बेदम मारहाण देखील करत होता. 2020 मध्ये आफताबने जळत्या सिगारेटने श्रद्धाच्या पाठीवर चटके दिले होते, जे तिने आपल्या एका मैत्रिणीला देखील दाखवले होते. त्यानंतर नालासोपारा येथील तुळींज पोलिस स्थानकात श्रद्धाने पोलिस केस दाखल केली होती. आफताब गळा दाबून सतत आपल्याला मारण्याची धमकी देत असल्याचं श्रद्धानं तक्रारीत म्हटलं होतं. या तक्रारीनंतरही पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

(हेही वाचाः Shraddha Walkar Murder Case: श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी व्यक्त केलेली ‘ती’ भीती ठरली खरी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.