मेट्रो १ ने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपद्वारे ई- तिकीट वितरित करण्याची प्रणाली सुरू केली आहे. यामागे तिकिटांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न आहे.
( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाला एका दिवसात अतिरिक्त ३ लाखांचा फायदा! काय आहे कारण?)
प्रवाशांना मुंबई मेट्रो प्रशासनाच्या क्रमांकावर इंग्रजीत Hi असे टाइप करून पाठवताच त्यांना ओटीपी क्रमांक व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार आहे. तिकीट खिडकीवर हा ओटीपी किंवा लिंकचा वापर करून रोख पैसे देताच व्हॉट्सअॅपवर ई-तिकीट येणार आहे. हे तिकीट स्कॅन केल्यावर प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मेट्रो प्रवासाचे तिकीट प्रवाशांना रांगेत उभे रहायला लागू नये आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधा महामेट्रोकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅपवर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना ९६७०००८८८९ या क्रमांकावर संदेश पाठवावा लागणार आहे. यानंतर प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर लिंक येईल याद्वारे प्रवासी ई-तिकीट खरेदी करू शकतात. स्मार्ट फोनवरून मुंबई मेट्रो वन ई-तिकीट खरेदी करण्यासाठी फक्त व्हॉट्सअॅप वापरणे आवश्यक आहे. या तिकिटावर क्यू आर कोड सुद्धा उपलब्ध असणार आहे. या नव्या योजनेमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे.
मेट्रोची वैशिष्ट्ये
- सध्याच्या आठवड्यातील रायडरशिप = ३ लाख ८० हजार
- वर्सोवा आणि घाटकोपरहून पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता आहे.
- वर्सोव्याहून शेवटची मेट्रो रात्री ११.२० वाजता आहे
- घाटकोपरहून शेवटची मेट्रो रात्री ११.४५ वाजता धावते.