नोकरीनंतर सेवानिवृत्त झाल्यावर आयुष्य कसे जगावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. त्यामुळे अनेक लोक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून निवृत्तीनंतर सुखी जीवन कसे जगता येईल यासाठी प्रयत्न करतात. बाजारात अनेक पेन्शन योजना असतात ज्यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतर सुद्धा सुखी जीवन जगता येऊ शकतं. यासाठी सरकारने नागरिकांसाठी २०१७ मध्ये ‘प्रधानमंत्री वय वंदना’ ही योजना सुरू केली आहे.
( हेही वाचा : ५ लाख गरजूंचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार! सरकार राबवणार ‘अमृत महाआवास अभियान’)
‘प्रधानमंत्री वय वंदना’ ही योजना काय आहे ?
या योजनेत दर महिन्याला गुंतवणूक करून नागरिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि नियमित उत्पन्न या दोन्ही गोष्टी मिळू शकतात. या योजनेत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक सहभागी होऊन मासिक किंवा वार्षित पेन्शन निवडू शकतात. मासिक पेन्शन योजनेत १० वर्षांसाठी ८ टक्के व्याज आणि वार्षिक पेन्शन योजनेत १० वर्षांसाठी ८.३ टक्के व्याज मिळते.
तुम्हाला प्रधानमंत्री वय वंदना या योजनेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन गुंतवणूक करता येईल. ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला मासिक १ हजार रुपये पेन्शन हवे असल्यास १.६२ लाख रुपये गुंतवावे लागतील.
तसेच या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पेन्शन हवी असल्यास संबंधितांना १५ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. १५ लाख रुपये गुंतवल्यास महिन्याला ९ हजार २५० रुपये पेन्शन मिळू शकते.
अर्ज कसा करायचा ?
प्रधानमंत्री वय वंदना ऑनलाईन आणि ऑफलाईन गुंतवणूक करता येईल. LIC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पॉलिसी खरेदी करा त्यानंतर हियर टू बाय या पर्यायाची निवड करा. यानंतर PMVVY यावर क्लिक करावे. तुम्ही सर्व कागदपत्र जोडून पॉलिसी खरेदी करू शकता.
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बॅंक खाते पासबुक
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- सेवानिवृत्ती पडताळणी दस्तऐवज