केंद्रीय समितीवर सदस्यपदी वर्णी लावण्याच्या मोबदल्यात डॉक्टरकडून ५० लाखांची मलई खाणाऱ्या ‘पीए’मुळे एका नेत्याची चांगलीच भंबेरी उडाली. दोन वर्षांत काम न झाल्यामुळे संबंधित डॉक्टरने या नेत्याच्या शासकीय निवासस्थानी गोंधळ घातला. त्याच्या खमंग चर्चा सध्या मंत्रालयातील प्रत्येक माळ्यावर चवीचवीने सुरू आहेत.
नाशिकचा एक युनानी होमिओपॅथी डॉक्टर केंद्रीय समितीत सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने राजकारण्यांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात त्याची भेट एका बड्या नेत्याच्या पीएशी झाली. युनानीच्या केंद्रीय समितीत सदस्यपदी वर्णी लावण्याच्या मोबदल्यात त्याने ५० लाखांची मागणी केली. डॉक्टरने त्यास होकारही दिला, पुढच्या काही दिवसांत सगळे पैसे जमाही केले. पण दोन वर्षे झाली तरी केंद्रीय समितीवर नियुक्ती न झाल्याने आपली फसगत झाल्याचे त्याच्या निदर्शनास येताच त्याने थेट या नेत्याचे शासकीय निवासस्थान गाठले आणि गोंधळ घातला.
( हेही वाचा: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘…कदापि खपवून घेणार नाही’ )
पीएने ५० लाख घेतल्याची माहिती डॉक्टरने गोंधळ घातल्यानंतर या नेत्याला कळली. तोपर्यंत हा नेता संपूर्ण प्रकरणाबद्दल अनभिज्ञ होता. त्याने डॉक्टरकडून घडला प्रकार समजून घेतला आणि पीएला कडक शब्दांत झापले. तसेच सर्व पैसे तत्काळ परत करण्याची सूचना केली. हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची कुणकुण लागताच या नेत्याने संबंधित पीएला आस्थापनेतून दूर केले.
Join Our WhatsApp Community