गोवंडी पाठोपाठ ‘या’ वॉर्डात रुग्णसंख्या वाढली पण लसीकरणामुळे वाचली बालके

136

गोवंडीपाठोपाठ आता कुर्ल्यामधील एल वॉर्डात गोवरची साथ पसरली आहे. लहान बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. कुर्ला येथील एल विभागात गोवरच्या रुग्णांचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. आतापर्यंत २१ बालकांना गोवरची बाधा झाली आहे त्यातील केवळ ३ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. बहुतांश बालकांचे गोवरप्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने रुग्णसंख्या वाढूनही मृत्यू रोखण्यात एल वॉर्ड यशस्वी ठरला आहे. एल वॉर्डात सध्या १५७ संशयास्पद गोवरचे रुग्ण आहेत.

( हेही वाचा: कल्याण येथे इमारतीत शिरला बिबट्या; हल्ल्यात दोन नागरिक जखमी )

एल वॉर्डातील कुर्ला पश्चिमेतील काजूपाडा हा गोवरच्या रुग्णांचा हॉटस्पॉट ठरला आहे. वर्षाच्या सुरुवातीला या भागांत गोवरची बाधा झालेली दोन बालके सापडली होती. त्यानंतर कित्येक महिने एल वॉर्डात गोवरचे रुग्ण आढळले नाहीत. ४ नोव्हेंबरनंतर एकट्या काजूपाडा येथे ६ बालकांना गोवरची लागण झाल्याचे आरोग्यसेविका आणि आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी घरोघरी केलेल्या सर्व्हेक्षणात सापडले. एल वॉर्डातील सहा पालिका आरोग्यकेंद्रात सध्या गोवरचे रुग्ण सापडले आहेत. काजूपाड्याखालोखाल कुर्ला पश्चिमेतील अमरनगर येथे ७, ट्युलिप आरोग्य केंद्रातील परिसरात २, कुर्ला स्थानकाजवळील बुद्ध कॉलनीत एक रुग्ण सापडला आहे. कुर्ला पूर्व येथील कामगार नगरात तब्बल ७ बालकांना गोवरची बाधा झाल्याचेही उघडकीस आले आहे. मात्र आता केवळ ३ जणांवरच चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवईतील तुंगा व्हिलेज तसेच कुर्ला पश्चिमेतील बैलबाझार येथे गोवरची लक्षणे आढळलेली प्रत्येकी एक बालक सापडले आहे. या दोन्ही बालकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे बोलले जात आहे.

आम्ही धर्मगुरुंची भेट घेतली असून, प्रार्थनेदरम्यान गोवरप्रतिबंधात्मक लस लहान बालकांना देण्याचे आवाहन करण्यास आम्ही विनंती केली आहे. खासगी डॉक्टरांकडे उपचारास येणा-या बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळल्यास आम्हांला तातडीने कळवा, अशीही माहिती देण्यात आली आहे. –डॉ रवींद्र हंगे, वैद्यकीय अधिकारी, एल वॉर्ड 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.