सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी तुपकर आज, गुरूवारी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार होते. मात्र तुपकर यांनी जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक होती. यासह शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – “सावधान! पुढे…”; नवले पुलावरील वाढत्या अपघातानंतर पुणेकरांच्या ‘पुणेरी पाट्या’)
काय म्हणाले रविकांत तुपकर
शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत, त्यांना थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी रविकांत तुपकरांना सांगितले. मागण्या मान्य केल्याने बऱ्याचअंशी आमचं समाधान झाले आहे, त्यामुळे आजचे होणारे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. पण राज्य सरकारने त्यांच्या शब्द फिरवला तर पुन्हा एकदा आंदोलन केले जाईल.
दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा निघाला होता. त्यावेळी तुपकरांनी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात आंदोलन करू असा इशारा दिला होता. यानुसार आंदोलनही सुरू होते. याप्रकऱणी रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती. तुपकरांना नोटीस दिल्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. मात्र अशा नोटिशींना मी घाबरत नाही. काही झाले तरी जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका तुपकरांनी मांडली होती.
Join Our WhatsApp Community