मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठका रद्द करून ज्योतिषाला हात (भविष्य) दाखवण्यासाठी गेले, असा आरोप विरोधकांकडून, विशेषतः उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. मात्र, ज्यांना दाखवायचा होता, त्यांना मी ३० जूनलाच हात दाखवला, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.
(हेही वाचा – महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का?; भाजपाचा सवाल)
शिंदे म्हणाले, मी शिर्डीला गेलो तेव्हा दोन मंत्री, अधिकारी आणि मीडिया सोबत होतो. आम्ही सगळे काही उघडपणे करतो. यांच्यासारखे लपूनछपून करीत नाही. हात दाखवायचे म्हणाल, तर आम्ही ३० जूनला ज्यांना दाखवायचा त्यांना दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे या राज्यात त्यांचा अवमान कोणीही सहन करणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून जे सुरू आहे, ते महाराष्ट्राला शोभणारे नाही. आम्ही दिवसरात्र काम करीत आहोत, ते पाहून यांच्या पायाखालची वाळू सारकलेली आहे. त्यामुळेच असे प्रकार सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
…तेव्हा मी ४० दिवस तुरुंगात होतो
कर्नाटकचा विषय हा २०१२ चा आहे. इतक्या वर्षांत तुम्ही या सीमाप्रश्नी काय निर्णय घेतला. हा एकनाथ शिंदे स्वतः ४० दिवस तुरुंगात गेला. आम्ही सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहोत. महाराष्ट्राचा एकही तुकडा कुठेही जाणार नाही. ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
Join Our WhatsApp Community