मुंबईत राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर आता भाजपपाठोपाठ उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप नोंदवला. महापालिकेच्यावतीने २४ प्रशासकीय कार्यालयांमध्ये सुशोभिकरणाअंतर्गत जी १६ कामे अंतर्भूत केली आहे,त्यासाठी स्वतंत्र निविदा काढून कामे करणे आवश्यक आहे. परंतु भायखळा ई विभागासह काही विभागांमध्ये या १६ कामांच्या स्वतंत्र निविदा ऐवजी सर्व कामांसाठी एकच निविदा काढण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेवरच शिवसेनेने आक्षेप नोंदवून सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एकच प्रचलित निविदा पध्दत राबवावी आणि ज्या प्रशासकीय विभागांमध्ये सर्व कामांसाठी एकच निविदा काढली आहे,त्या निविदा रद्द कराव्या अशाप्रकारची मागणी शिवसेनेने केली आहे.
( हेही वाचा : FIFA 2022 : जपानने मॅचसोबत जिंकले संपूर्ण जगाचे मन! स्टेडियममध्ये दिला महत्त्वाचा संदेश; व्हिडिओ होतोय व्हायरल)
मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सुशोभिकरणाच्या कामे महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार न करता अधिकारी कुणाच्या दबावाखातर निविदा मागवून या परिपत्रकांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक व उपनेते मनोज जामसूतकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
सुशोभिकरणासंदर्भात काही प्रशासकीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र निधी सांकेतांक असल्याने त्यासाठी नमुद केलेल्या १६ कामांसंदर्भात स्वतंत्र निविदा काढल्या जात आहेत, तर काही प्रशासकीय कार्यालयांमध्ये काही विशिष्ट कंत्राटदारांना मदत करण्यासाठी १६ कामांच्या एकत्र निविदा काढण्याचा प्रकार होत आहे. सुशोभिकरणाअंतर्गत ज्या १६ कामांचा समावेश केला आहे, त्यासाठी स्वतंत्र निविदा काढणे हे महापालिकेच्या प्रचलित पध्दतीनुसार तसेच नियमांनुसार योग्य असताना काही प्रशासकीय विभागांमध्ये यासर्वांच्या एकत्र निविदा काढल्या जात असून परिणामी सुशोभिकरणाची कामे योग्यप्रकारे होणार नाही तसेच यामुळे कामातील पारदर्शकतेचा आणि दर्जेदार कामांचा अभाव दिसून येवू शकतो,असे जामसुतकर यांनी स्पष्ट केले.
याबाबत जामसूतकर यांनी महापालिकेच्या ई विभागातील एक उदाहरण दिले आहे. महापालिकेच्या ‘ई’ विभागाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी सुशोभिकरणासाठी जो ३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, त्याचा खर्च करण्याचा निधी सांकेतांकही स्वतंत्र आहेत. तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विभागांमधील या १६ कामांसाठी स्वतंत्र निविदा न काढता एकच निविदा काढली आहे. ज्यामध्ये एकाच कंत्राटदाराकडून विविध प्रकारची कामे केली जातील,अशा स्वरुपाचा विचार प्रशासनाचा आहे, जो महापालिकेच्या प्रचलित निविदा पध्दतीनुसार अयोग्य आहे. या निविदेमध्ये एका ठराविक कंत्राट कंपनीला काम देण्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप केला.
एकच सामायिक निविदा मागवताना निविदेत भाग घेणाऱ्या कंपन्यांकडून स्टेनलेस स्टील शिट, स्टेनलेस स्टील पाईप, एम एस अँगल, कोन, चौरस पाईप, सी चॅनेल, गॅल्वनाईज्ड शिट यांचे नमुना चाचणीसाठी सादर करण्याची विशेष अट घालण्यात आली आहे. अशाप्रकारची कोणतीही अट इतर प्रशासकीय विभागांकडून मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये नाही, तर मग ई विभागाच्यावतीने मागवण्यात आलेल्या निविदेत का असा सवाल करत यासाठीचा सुत्रधार कोण असा अशीही विचारणा केली. त्यामुळे अधिकारी कोण आणि पडद्यामागील कलाकार कोण हेही समोर यायला हवे. याकरता या निविदा पध्दतीची चौकशी केली जावी अशी मागणी जामसूतकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांची भेट घेत केली आहे.
याशिवाय अजुन एका निविदेतील अटीकडे प्रशासनाचे लक्ष वेधू इच्छितो की यासाठी निविदेमध्ये कंत्राटदाराची बिड कॅपेसिटी ही दोनच्या ऐवजी तीन टाईम करण्यात आली आहे. यावरून निविदा कुणाला देण्याचा इंटरेस्ट आहे हेही उघड होत आहे,ही बाबही आपण वेलरासू यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असल्याचेही जामसूतकर यांनी सांगितले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ई विभागांमधील सुशोभिकरणाच्या निविदांमध्ये काही प्रमाणात होणारा हस्तक्षेप आणि प्रचलित निविदा पध्दतीचा अवलंब केला जात नसल्याने या विभागाची निमंत्रित केलेली निविदा रद्द करून पुन्हा नव्याने प्रत्येक कामांसाठी स्वतंत्र निविदा निधी सांकेतांक नुसार काढण्यात यावी. या ई विभागासह काही प्रशासकीय विभागांमध्ये जर एकच निविदा काढली जात असेल तर त्याची चौकशी केली जावी आणि जर असा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबतचे सुधारीत परिपत्रक जारी करून प्रत्येक विभागांसाठी निविदा निमंत्रित करण्याच्या प्रचलित पध्दतीचा सुचना करण्यात याव्या. अशी मागणी जामसूतकर यांनी केली.
Join Our WhatsApp Community