कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा सांगितल्यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून एकही गाव जाणार नसल्याचे सांगितले आहे. त्यावरुन बोम्मई यांनी टीका केल्यानंतर आता फडणवीस यांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे.
सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल
जेव्हापासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आहे. तेव्हापासून महाराष्ट्राने याबाबत आपली भूमिकी पक्की ठेवली आहे. आपल्या देशात संविधान आहे आणि त्याअंतर्गत राज्यांना अधिकार देण्यात आले आहेत. महाराष्ट्राने आपली मागणी सर्वोच्च न्यायालयासमोर सर्व पुराव्यांसकट मांडली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल.
(हेही वाचाः एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, उलट बेळगाव महाराष्ट्रात घेणार! फडणवीसांनी स्पष्टच सांगितले)
त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे त्यांनी काहीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातून एकही गाव कुठेही जाणार नाही आणि महाराष्ट्राचा सीमाभाग महाराष्ट्राला परत मिळेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मी चिथावणीखोर विधान केलं नाही
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बोम्मई यांच्या दाव्याला विरोध करत बेळगाव,कारवार आणि निप्पाणीसह महाराष्ट्राची गावं महाराष्ट्रात परत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यावरुन फडणवीसांनी चिथावणीखोर भाष्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
(हेही वाचाः श्रद्धाने दिलेल्या पत्रावर कारवाई का झाली नाही?, पोलिसांनी दिले स्पष्टीकरण)
मी कुठलंही चिथावणीखोर वक्तव्य केलं नाही. ज्या गावांवर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दावा सांगितला आहे, ज्यासाठी आम्ही लढा देत आहोत ती गावं परत घेण्याबाबत मी बोललो. त्यामुळे संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत येणा-या गोष्टींना चिथावणीखोर म्हणता येणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community