दादरच्या पादचारी पुलाखालील ते अडथळे केले महापालिकेने दूर; दादरच्या दुसऱ्या कारवाईने प्रवाशी सुखावले

169
दादर पश्चिम येथील चार फुल विक्रेत्यांच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई केल्यानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागाने दादरची पूर्व व पश्चिम बाजूला जोडणाऱ्या येथील पादचारी पुलाची पायवाट साफ केली. कैलास लस्सीकडून दादर  फुल मार्केटला जोडल्या गेलेल्या महापालिकेच्या पादचारी पुलावरून खाली उतरल्यावर चार दुकानांनी केलेले वाढीव अनधिकृत बांधकाम आणि वीज दिव्यांचे खांब यामुळे पादचारी तथा प्रवाशी यांना चालता येत नव्हते. मागील अनेक वर्षांपासूनची ही समस्या गुरुवारी सकाळी कायमची दूर करण्यात आली. येथील दोन्ही विजेचे खांब काढून वाढीव अतिक्रमण तोडल्यामुळे पुलावरून उतरताना लागणार ब्रेक आता लागत नसल्याने आता नागरीकांना सहज चालता येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईबाबत नागरिक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.
मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील केशव सुत उड्डाणपुलाखाली उपेंद्र नगर इमारतीच्या खालील बाजूस भिंतीवर मार्बल टाकून वाढीव बांधकाम केलेल्या ४ ते ५ अनधिकृतपणे  फुल विक्रेत्यांच्या गाळ्यांवर कारवाई केली होती.
गाळ्यांचे वाढीव अनधिकृत बांधकाम शिवाय फुलांच्या टोपल्या बाहेरच्या बाजूला लावून डबल अतिक्रमण केले जात होते. त्यामुळे या ठिकाणी फुल खरेदी करणाऱ्या नागरिकांसह पादचाऱ्यांना चालताना त्रास होत होता. यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होत होती, याचा फायदा घेऊन पाकिट मारीचे प्रकार होत असल्याने अनेकांना यांचा फटका बसत होता. त्यामुळे ही बांधकामे तोडत येथील रस्ता चालण्यास मोकळा करून देत येथील होणारी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कारवाई झालेल्या गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
मात्र, या कारवाईनंतर दादर पूर्व व पश्चिम बाजूला जोडणारे पूल जिथे पश्चिमेला अर्थात सेनापती बापट मार्गावरील कवी केशवसुत उड्डाण पुलाकडे उतरते, तिथे पादचाऱ्यांना चालताना होणारी गैरसोय आणि प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी या गर्दीतून वाट काढून जाताना होणारा विलंब याची दखल घेत येथील गाळ्यांनी केलेले वाढीव बांधकाम आणि त्यातच दोन विजेचे खांब याचा आधार घेत फेरीवाल्यांनी अडवलेल्या जागेचा विचार करता गुरुवारी सकाळी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी अतिक्रमण विभाग, परवाना विभाग, इमारत व कारखाना विभागाच्या चमुसह स्थानिक पोलीसांच्या मदतीने दुकानांच्या वाढीव बांधकामांवर कारवाई करताना येथील दोन खांब काढून टाकले. त्यामुळे येथील जागा आता मोकळी झाली असून पायवाट मोकळी आणि सुटसुटीत झाल्याने प्रवाशी आणि खरेदीला येणाऱ्या नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
फुल विक्रेत्यांमुळे या भागात नागरिक खरेदीला येत असले तरी येथील जागेत फुलांच्या टोपल्या पुढील जागेत लावून केले जाणारे अतिक्रमण आणि समोरच्या बाजूनेही फुल विक्रेते बसत असल्याने नागरिकांना चालण्यास केवळ एक ते दीड फुटांची जागा शिल्लक राहायची. शिवाय या गर्दीतून पादचारी पुलावर जाण्यासाठी वळताना आधीच दुकानांनी केलेले वाढीव बांधकाम आणि त्यापुढे फुल विक्रेते यांचे धंदे यामुळेच चालण्यास जागा नसायची. परंतु आधी चार ते पाच गाळयांच्या अनधिकृत बांधकामावर केलेली कारवाई आणि त्यानंतर पूल उतरणीच्या ठिकाणी दुकानांचे वाढीव बांधकामांवर केलेली कारवाई आणि येथील अडथळा ठरणारे दोन खांब काढल्याने पुलावरून दादर उतरताना नागरिक तथा रेल्वे प्रवाशांच्या चालीचा वेग अधिक जलद गतीने वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.