शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे नेतेही सैरभर झाल्यासारखे पळू लागले असून हिंदुत्व आणि मराठी मुद्दयापासून लांब पळणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आजवर इतर राज्यातील नेते हे ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी पायधूळ झाडायचे, परंतु आता छोटे ठाकरे मात्र इतरांच्या घरी जाऊन पायधूळ झाडत आहे. त्यामुळे बिहारमध्ये जाणारे आदित्य ठाकरे हे पहिले ठाकरे कुटुंबातील सदस्य असून जिथे बाळासाहेबांनी एक बिहारी, सौ बिमारी म्हणत बिहारी जनतेचा अपमान केला होता, त्याच बिहारच्या नेत्याला भेटून बिहारी जनतेला आपलेसे करण्याच्या प्रयत्नात बाळासाहेबांना जी बिमारी नको होती, ती त्यांच्या नातवाला हवीहवीशी वाटू लागल्याने जनताच संभ्रमात पडली आहे.
शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख तथा माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, माजी नगरसेवक समीर देसाई आणि राहुल कनाल यांच्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी बिहार आणि पटना दौऱ्यावर तेजस्वी यादव यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक शिवसैनिकांना मार्च २००८ मध्ये शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाची आठवण झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी लिहिलेल्या या अग्रलेखाचे शिर्षक हे एक बिहारी, सौ बिमारी असे होते. या अग्रलेखात बाळासाहेबांनी असे म्हटले होते की, बिहार राज्य मागासलेले राज्य आहे आणि तेथील नेत्यांनी राज्यासाठी काहीच केलेले नाही. त्यामुळे बिहारची जनता म्हणजे शेणातले किडे असून एक बिहारी, सौ बिमारी अशा शब्दांत बिहारी जनतेचे वर्णन केले होते. त्यामुळे बिहारी हटाव, जॉब बचाव अशाप्रकारे बिहारी जनतेचा बाळासाहेबांनी समाचार घेताना बिहारच्या खासदारांबाबत न्यायालयांमध्ये गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांकडून आम्हाला काही शिकण्याची गरज नाही. या अग्रलेखात त्यांनी बिहारमधील तत्कालिन खासदार प्रभूनाथ सिंह यांचे उदाहरण देत ते अनेक गुन्हेगारी प्रकरणात गुंतले असल्याचे म्हटले होते.
त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जर बाळासाहेबांनी लिहिलेला अग्रलेख वाचला असता तर बिहारला गेले नसते आणि बिहारबाबत आजोबा म्हणजे बाळासाहेबांनी मांडलेल्या भूमिकेशी फारकत आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचाही अवमान केल्याची प्रतिक्रिया जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. शिवसेना आता हळूहळू बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जात असून बिहार दौरा आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची भेट ही सुध्दा वेगवेगळ्या धोरणांना आणि विचारांना अंगीकृत करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाला भेटून आदित्य ठाकरे यांना काय सिद्ध करायचे आहे असाही सवाल शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे राज्याबाहेर कोणत्याही नवीन पक्षाच्या नेत्यांशी किंवा पक्षांशी बोलणी अथवा भेटीगाठी असतील तर त्याची प्रमुख जबाबदारी ही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर असते. परंतु बिहार आणि पटना दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी अनिल देसाई यांच्यासह काँग्रेसमधून आलेले चर्तुवेदी आणि माजी नगरसेवक समीर देसाई यांना सोबत ठेवत आपली टिम कोण असणार हे दाखवून दिले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी राज्याबाहेर इतरांच्या मदतीने हातपाय हलवताना पक्षाच्या मूळ ध्येय आणि धोरणांशी फारकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा शिवसेनेत ऐकायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community