खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे रूंदीकरण करून बीआरटी मार्ग विकसित करण्याबरोबरच बोपोडी येथील उर्वरित कामे पूर्ण करणे या कामांसाठी ७४ कोटी ७५ लाख ८९ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनाअभावी सहा वर्षांपासून रखडलेले रस्ता रूंदीकरणाचे काम आणि बीआरटी प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : मोबाईलमधून लीक होऊ शकते वैयक्तिक माहिती, तुमचे फोटोज आणि व्हिडिओ; ‘या’ चुका करत असाल, तर वेळीच सावध व्हा! )
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर होणार बीआरटी मार्ग
पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडणार आणि सर्वाधिक वाहतूक असलेला जुना मुंबई-पुणे महामार्ग हा एक रस्ता आहे. पिंपरी हद्दीत दापोडीपर्यंतच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, परंतु पुणे महापालिका हद्दीत लष्कराने खडकीतील २.१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी जागा दिली नव्हती. यासाठी महापालिकेकडून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. हा रस्ता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) ४२ मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षित आहे. सध्या हा रस्ता केवळ २१ मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेकडून २०१५ पासून पाठपुरावी सुरू होता. २०१६ मध्ये याची निविदा काढण्यात आली होती. पण रस्त्यासाठी जागाच नसल्याने काम झाले नव्हते. आता सहा वर्षानंतर लष्कराने ही जागा ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर काही ठिकाणी खासगी जागा मालकांकडून जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community