‘या’ भागातील बंद बस सेवेमुळे खासदार संतापल्या, PMPML च्या प्रशासनाला सवाल

146

बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या पीएमपीएमएल (PMPML) च्या बससेवा बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या असून गोरगरीबांची मुलं शिकावीत असं पीएमपीएमएलच्या कर्त्या-धर्त्यांना वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या सगळ्या मार्गांवरील बससेवा सुरू ठेवा अन्यथा आपण स्वतः आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

(हेही वाचा – पुण्यातील ‘या’ 11 मार्गांवर PMPMLची सेवा होणार बंद!)

बारामती लोकसभा मतदार संघाच्या पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, दौंड तालुक्यातील पाटस, मुळशी तालुक्यातील पौड पासून मुठा गाव, खडकवासला विधानसभा मतदार संघातील पानशेत, वरसगाव या मार्गांवर गेल्या एक-दोन वर्षांत पीएमपीएमल बससेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी (MSRTC) ची अपुरी सेवा आणि खासगी वाहनांचे भरमसाठ भाडे अशा कात्रीत सापडलेल्या याभागतील शेकडो प्रवाशांना बस सेवा सुरू झाल्यामुळे मोठा आधार मिळाला आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, दूर अंतरावर काम करणारे कर्मचारी, आरोग्य सेवेसाठी शहरात जावे लागणारे रुग्ण इतकेच नाही, तर मार्केट यार्ड आणि मंडई मध्ये नित्यनेमाने येणारे किरकोळ भाजी विक्रेते तसेच शेतकऱ्यांनाही या बसचा मोठा आधार निर्माण झाला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – … म्हणून पुणे स्टेशन ते पारगाव PMPML ची बससेवा बंद न करण्याची होतेय मागणी)

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, अशा परिस्थितीत ही सेवा बंद झाल्यास या सर्वांचे मोठे हाल होणार असून सर्वसामान्य जनतेची ही हक्काची वाहतूक व्यवस्था बंद होणे योग्य ठरणार नाही. या भागातून धावणाऱ्या कोणत्याही बस पाहिल्या तर सतत त्या प्रवाशांनी भरभरून धावत असतात. यावरून या नागरिकांना त्यांची किती गरज आहे, ते लक्षात येते. हे मार्ग तोट्यात असले तरी व्यापक जनहिताचा विचार करता केवळ नफा-तोट्याचा विचार करुन ही सेवा बंद पाडणे सर्वथा अनुचित आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने हे लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घालून ही सेवा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.