शरद पवार हिंदू श्रद्धांचा द्वेष का करतात? हिंदूंच्या देवीदेवतांचा अपमान करुन कोणते सूख मिळणार आहे?

232

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी शिर्डीत जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे आरोप झाले की, त्यांनी सिन्नरमध्ये जाऊन ज्योतिषाला हात दाखवला. परंतु उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा आरोप नाकारला आहे आणि शिंदे यांना फसवण्यासाठी हा आरोप करण्यात आला आहे.

यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता हल्ली नवीन गोष्टी पाहत आहोत. महाराष्ट्रात याआधी असे होत नव्हते.”

पुढे त्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला ट्रीप असे संबोधले व म्हणाले “आसाममध्ये काय घडले हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची ट्रीप होणार असल्याचे मी वाचले. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला जाणे आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणे या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे, विज्ञानाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून लौकीक आहे. महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. माझी खात्री आहे की, सुविद्य पिढी या सर्व गोष्टींचा स्वीकार करणार नाही. हे जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात.”

(हेही वाचा shraddha murder case : महाविकास आघाडी सरकारच्या आरोपावर उत्तर देण्यास उद्धव ठाकरेंनी का टाळले?)

यावर भाष्य करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या, “बुडत्याला काडीचा आधार म्हणून येथे देवाला जा.. कामाख्याला जा, ज्योतिषाकडे जा.. असे सुरू आहे. कामाख्या देवी जादूटोणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखे असे त्या ठिकाणी जाणे व जादूटोणा यांसारख्या गोष्टीला प्रोत्साहन देणे योग्य नाही. मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती असे जादूटोणा, मंत्र तंत्र असे करत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला ते मान्य होणार नाही.”

आता या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता त्यांचा हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर किती राग आणि द्वेष आहे हे सहज दिसून येते. ज्योतिष विद्या खरी की खोटी हा मुद्दा वेगळा आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचा ज्योतिषावर विश्वास असेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जोपर्यंत एखाद्या श्रद्धेमुळे कुणाच्या जीवावर बेतत नाही किंवा श्रद्धेपोटी वैद्यकीय उपचार न घेता पाद्रीच्या चरणी लोटांगण घालत नाही तोपर्यंत त्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे अनेक व्हिडिओज फेसबुक व इतर सोशल मीडियावर येत राहतात. त्यात तो चमत्कारिक पाद्री येशूच्या मदतीने अनेक रोग बरे करण्याचा दावा करतो. किडनी फेल झालेला रुग्ण टूणटूण उड्या मारु लागतो. त्यावर शरद पवारांचे काही पुरोगामी विचार आहेत की नाही? की केवळ हिंदू धर्मावर टीका करण्याची भीष्म प्रतिज्ञा पवारांनी घेतली आहे? या विषयावर पवार कधी बोलल्याचे किंवा एखादी चळवळ राबवल्याचे आठवत नाही. रोग बरा करणारा येशूचा पाद्री त्यांना चालतो. त्यास अंधश्रद्धा म्हणता येत नाही, असे पवार व त्यांच्या साथीदारांना वाटते का?

(हेही वाचा रिचाने नवरा केला अली, तिची बुद्धी भ्रष्ट झाली…केला भारतीय सैनिकांचा अवमान)

हल्लीच सुप्रियाताईंनी मीडियातल्या बायकांना साडी नेसण्याचा (मीडियाने साडी घालणे अशी हेडिंग दिली होती.) सल्ला दिला होता. हा सल्ला कोणत्या पुरोगामीत्वात बसतो. मांसाहार केला म्हणून शरद पवारांनी मंदिरात प्रवेश केला नाही. कोणता देव म्हणतो की मासांहर केल्यावर मंदिरात प्रवेश करु नका. आमचा हिंदू देव तर असं म्हणत नाही. मग इतर पंथातला देव असं म्हणतो का? ही अंधश्रद्धा नाही का? शरद पवार मंदिरात गेले की ते पुरोगामी दर्शन ठरतं आणि मुख्यमंत्री शिंदे देवळात गेले की ती अंधश्रद्धा ठरते का? इफ्तार पार्ट्यांना जाताना पुरोगामी महाराष्ट्राचं काय होतं? त्यावेळी कुठे जातो पुरोगामीपणा? केवळ हिंदूंनाच टार्गेट करण्याचा विडा पवारांनी उचलला आहे का? कामाख्या देवी हे स्थानिक हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. विद्या चव्हाण यांना तिथे जादूटोणा दिसतो. मग आरारारारारा करणार्‍या पाद्र्यांमध्ये काय दिसतं, हा प्रश्न विद्याताईंना विचारावासा वाटतो.

खरं पाहता श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग होऊच शकत नाही. कारण ईश्वरावर व त्यासंबंधित गोष्टींवर केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम, ख्रिस्ती व इतर अनेक पंथ श्रद्धा ठेवतात. काही पंथातील श्रद्धा तर इतक्या घातक असतात की इतर लोक त्या पंथाचे नाहीत म्हणून त्यांना तुच्छ लेखले जाते. त्यांचे धर्मांतरण केले पाहिजे किंवा ठार मारले पाहिजे अशी समज किंवा अंधश्रद्धा असते. मग अशा गोष्टींविषयी सोयीस्कररित्या मौन पाळले जाते. अनेक लोक डॉक्टरांकडे न जाता पाद्रींकडे जातात, तसे व्हिडिओज उपलब्ध आहेत. यावर  पवार व त्यांच्या साथीदारांनी काम करायला हवे. वैद्यकीय क्षेत्र आज इतके पुढे गेले असून देखील आरारारारा प्रकारचे लोक इतके फोफावले आहेत. मग जेव्हा हे क्षेत्र पुढारलेले नव्हते तेव्हा ह्यांनी काय हैदोस घातला असेल याची कल्पना न केलेली बरी!

मग जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडले नसतील तर मुद्दामून हिंदू श्रद्धांचा अपमान करण्यात कोणते सुख मिळते? ज्यावेळेस आघाडीचं सरकार होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता घरातच बसून होते आणि एकादशीला हतबल होऊन त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले तेव्हा शरद पवारांचं पुरोगामीत्व कुठे गेलं होतं. एकनाथ शिंदे तर कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील ईश्वरावर श्रद्धा होती, परंतु त्यांनी कर्तृत्वावर भर दिला आणि परकीय शत्रूंना ठेचून स्वराज्य निर्माण करुन दाखवले. असे छत्रपती आपले आदर्श आहेत. याविरोधात उद्धव ठाकरे वागले. त्यांनी छत्रपतींचा आदर्श न घेता ते घरात बसून राहिले आणि आता आपल्याने काही होणार नाही म्हणून विठ्ठलालाच कोरोना घालवायला सांगितले. एकनाथ शिंदे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम करत आहेत. एकीकडे ईश्वरावर श्रद्धा आणि दुसरीकडे कर्तृत्व यांची उत्तम सांगड शिंदे घालत आहेत. परंतु यात शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे आणि महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे का? हा सामान्य जनतेचा सवाल आहे.

आम्हा हिंदूंना असा प्रश्न पडतो की जे स्वतःला आपल्या कार्यकर्त्यांकडून ’जाणता राजा’ म्हणवून घेतात, असे ज्येष्ठ व अनुभवी नेते शरद पवार यांना हिंदूंच्या देवीदेवतांचा आणि श्रद्धांना अपमान करुन कोणते सुख मिळते?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.