वैद्यकीय शिक्षण विभागात साडेचार हजार पदांची भरती

153

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात लवकरच ४ हजार ५०० पदे भरली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी दिली. सरळसेवा गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील पदांचा यात समावेश आहे.

( हेही वाचा : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला बेमुदत संपाचा इशारा )

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेली गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरण्याची प्रक्रिया टि.सी.एस, आयओएन या कंपनीमार्फत करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील ७५ हजार रिक्त पदे भरण्यास मंत्रिमंडळानेही मान्यता दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झालेली आहे अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्ताने रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे, असे महाजन यांनी सांगितले.

या पदांचा समावेश

या पदांमध्ये मुख्यत्वे तांत्रिक (तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक) व अतांत्रिक (उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक) पदे भरण्यात येणार आहेत. पदभरती बाबतची जाहिरात दोन महिन्यात प्रसिद्ध करण्यात येणार असून ही पदभरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे विभागाने नियोजन केलेले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.