गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र या सुरू असलेल्या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली ते 76 वर्षांचे होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून आज, शनिवारी सायंकाळी ६ वाजता वैंकुठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले हे कायम चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रूपेरी पडदा अशा तिनही माध्यमांत काम केले आहे. त्यांनी रंगभूमीवर एक मोठा काळ गाजवला.
(हेही वाचा – वाह…क्या बात है! ISRO ने एकाच वेळी अंतराळात सोडले 9 उपग्रह)
अभिनय शैलीने गोखलेंचा दबदबा कायम
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अनोख्या अभिनय शैलीने विक्रम गोखलेंचा दबदबा कायम होता. मराठी मालिका विश्वातील अग्निहोत्र या मालिकेत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी घशाच्या त्रासामुळे नाटकापासून ब्रेक घेतला होता. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अभिनयाचे बाळकडू कुटुंबातूनच
विक्रम गोखले यांना अभिनयाचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले होते. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठीतील दिग्गज अभिनेते होते. तर त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल अभिनेत्री होत्या. 1993 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या मोहिनी भस्मासुर नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती.
Join Our WhatsApp Community