कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यामुळे आम्ही फक्त सत्य बोलणार तुम्ही कोणाला गद्दार बोलता? असा सवाल मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. बुलढाण्यातील सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर खोचक शब्दात टीका केल्यावर आता केसरकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंना भेटायला २० ते २५ आमदार गेले होते, परंतु त्यांनी ऐकले नाही या आमदारांना कॉंग्रेस – राष्ट्रवादीपासून दूर जाऊया असे सांगितले होते. यांनी खोटं बोलण्याची आता एक मोहीम चालवली आहे. खोटे बोलण्यासाठी यांनी लोकं पण तयार केली आहेत एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल असा थेट इशारा मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे गटाला दिला आहे.
( हेही वाचा : मुंबईतील मेट्रो स्थानके पूरमुक्त असणार! पाण्याचा निचरा करण्यासाठी विशेष यंत्रणा)
ज्या लोकांनी तुमच्यासाठी जीवन वेचलं त्यांची बदनामी करणे योग्य नाही
फ्रिजच्या मोठ्या खोक्यामध्ये पैसे भरून कोणाकडे गेले हे महाराष्ट्रासमोर आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा केसरकरांनी दिला आहे. ज्या लोकांनी तुमच्यासाठी जीवन वेचलं त्यांची बदनामी करणे योग्य नाही. अयोध्येला जाणारी रथयात्रा ज्यांनी अडवली त्यांच्या मुलाच्या पायाशी तुम्ही लोटांगण घालता, हे तुमचं हिंदुत्व आहे का? बदनामी सहन करण्याची मर्यादा असते ही मर्यादा जेव्हा ओलांडली जाईल तेव्हा आम्ही सुद्धा बोलणं सुरू करू, खोटं बोलण्याला मर्यादा असते, शेतकऱ्यांना सर्वात मोठी नुकसान भरपाई शिंदे-फडणवीस सरकारने दिल्याचा दावा केसरकरांनी केला आहे.
यासारखं मोठं दुर्दैव काय असेल?
जनतेने ज्याला कौल दिला त्याच्यापासून तुम्ही लांब गेलात अशी टीका केसरकरांनी केली आहे. तुम्ही का निवडणूक लढवली नाही याचंही उत्तर जनतेला द्या, नामांतराच्या मुद्द्याच्या ठरावादरम्यान कॉंग्रेसचे अनेक नेते अनुपस्थित होते याला तुम्ही सोबत असणं म्हणणार का? कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन बाळासाहेबांचं प्रेम गमवायची वेळ तुमच्यावर आली याच्यासारखं मोठं दुर्दैव काय असेल, आम्ही त्यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत म्हणून हा हिंदुत्वासाठी लढा दिला आहे असेही केसरकर म्हणाले.
…अन्यथा आम्ही सुद्धा तोंड उघडू
एवढ्या वर्षात अनेक ऑफर्स आल्या परंतु त्या सगळ्या आम्ही धुडकावून लावल्या असा दावा केसरकरांनी केला. आम्ही आमच्या तत्त्वासाठी भांडलो, मी ६७ वर्षांचा ज्येष्ठ आमदार वर्षाच्यासमोर रस्त्यावर उभा राहिलो होतो. चार-चार वेळा तुम्हाला कॉल केले, आम्हाला स्वाभिमान आहे पक्षात राहून उठाव केला, पक्षाच्या बाहेर उठाव केला नाही. हेच भेटण्यासाठी वेळ द्यायचे त्यानंतर त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सांगायचे आम्ही नाव घातलं होते पण आज वेळ नाही कळवले आहे. वैयक्तिक कामासाठी मी आलो नव्हतो, आम्ही जनतेची कामे घेऊन यायचो. तुम्ही जे निर्णय अडीच वर्षांत घेतले नाही ते आम्ही एका दिवसात घेतले आहेत असे केसरकरांनी सांगितले. खोटं बोलण्याची मर्यादा असते त्यांनी ती ओलांडू नये अन्यथा आम्ही सुद्धा तोंड उघडू असा इशारा केसरकरांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community