स्वातंत्र्याआधी वीर सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती संविधान निर्मितीची तयारी – प्रवीण दीक्षित

203

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी हिंदू महासभेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान बनवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली होती. स्वातंत्र्योत्तरकाळात आपल्याला कशी वाटचाल करायची आहे, याचा आराखडा या समितीने आखला होता, अशी माहिती निवृत्त पोलीस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी दिली.

hindusthan post

( हेही वाचा : खोटं बोलण्याची मर्यादा असते…फ्रिजच्या मोठ्या खोक्यामध्ये पैसे भरून कोणाकडे गेले हे लवकरच कळेल! केसरकरांचा इशारा)

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दीक्षित बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाहक राजेंद्र वराडकर, सहकार्यवाहक स्वप्नील सावरकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर उपस्थित होते. ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या संविधान विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रवीण दीक्षित म्हणाले, २१ मे १९४४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे संविधान बनवण्यासाठी हिंदू महासभेने स्वतंत्र समिती कार्यरत केली होती. त्यात दा. वि. गोखले, ल. ब. भोपटकर, केळकर, मो. रा. ढमढेरे यांचा समावेश होता. या समितीने संभाव्य संविधानाच्या रुपरेषेवर चर्चा करून, तसेच सर्व देशांच्या घटनांचा, तसेच भारतातील अधिकृत कागदपत्रांचा आधार घेत १०० पानांचा दस्तावेज प्रकाशित केला. त्याचे नाव होते स्वतंत्र हिंदुस्थानचे संविधान.

आपल्या देशाचे नाव हिंदुस्थान असावे, असे स्वतंत्र हिंदुस्थानच्या संविधानात नमूद करण्यात आले होते. कारण यामुळे हिंदुंचे महत्त्व अधोरेखित होईल. शिवाय या संविधानात अखंड भारताची संकल्पना मांडण्यात आली होती. लोकशाही, प्रजासत्ताक, संघराज्य पद्धतीने देशाचा कारभार चालवला जाईल. कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता, लष्कर, नौदल आणि हवाईदलात सर्वांना प्रवेश द्यावा, असे त्यात स्पष्टपणे म्हटले होते, असेही दीक्षित यांनी सांगितले.

सर्वांना दिला होता मतदानाचा अधिकार

कोणत्याही प्रकारचा लिंगभेद न करता, एक व्यक्ती एक मत या नियमानुसार प्रौढांना मतदानाच्या अधिकाराची शिफारस स्वतंत्र हिंदुस्थानच्या संविधानात करण्यात आली होती. मतदानाचे वय २१ असावे, असे त्यांनी निश्चित केले होते. या दस्तावेजाचा उल्लेख त्यावेळचे संविधान सभेचे सदस्य नरहर विष्णू गाडगीळ यांनी संसदेत केला होता. त्यामुळे सावरकरांनी स्वातंत्र्यापूर्वीच येणाऱ्या काळात आपल्याला कशी वाटचाल करायची आहे, याचा आराखडा आखून दिला होता, असे दीक्षित म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.