राज्य कायद्याने नाहीतर बेकायद्याने सुरु आहे. आपल्या डोक्यावर बेकायदेशीर सरकार बसवले आहे. हे सरकार लवकरच जाणार असल्याचा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 110 दिवस मी तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातात भगवा होता. हा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहणार, असे राऊत म्हणाले.
लोकसभा असो किंवा विधानसभा असो शिवसेनेचे 25 खासदार आणि 115 आमदार आपण निवडून द्यायला हवेत. शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करुन या रेड्यांचा राजकीय बळी घेतला पाहिजे तरच आपण शिवसैनिक, असे राऊत म्हणाले. ते बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
( हेही वाचा: पुढच्या दोन महिन्यात राज्य सरकार कोसळेल की विरोधक कोसळतील? )
शिंदे गटातील आमदार, खासदारांवर टीका
शनिवारी बुलढाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. लवकरच राज्यातील सरकार जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुलढाण्याच्या पवित्र भूमित गद्दारीची बीज रोवली आहेत. ती कायमची उखडून फेकण्यासाठी या मशाली पेटल्या आहेत, असे म्हणत राऊतांनी शिंदे गटाच्या आमदारांचा समाचार घेतला. बुलढण्यात किती खोके आले? सगळ्यात जास्त खोके बुलढाण्यात आले. एक फूल दोन हाफ. एक खासदार आणि दोन आमदार असे म्हणत राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांवर टीका केली.
Join Our WhatsApp Community