आसामच्या मुख्यमंत्र्यांना शहाजीबापू पाटलांच्या डायलाॅगची भुरळ; ‘काय झाडी, काय डोंगर’…

177

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील मंत्री आमदार, खासदारांसह गुवाहाटीला गेले आहेत. हा दौरा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील शिंदे गटात गेले अन गुवाहाटीला पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी केलेला एक फोन प्रचंड व्हायरल झाला. त्या फोन काॅलमधील काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, सगळे एकदम ओक्के हा डायलाॅग तर प्रचंड गाजला. त्यावर खूप चर्चा झाली, इतकेच काय त्यावर गाणीदेखील बनली. त्याचा परिणाम आता असा झाला आहे की, शहाजी बापूंना जिथे जाईल तिथे हा डायलाॅग म्हणण्याची विनंती केली जाते.

त्यामुळे शहाजीबापूंची भुरळ आता आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना देखील पडली. त्यांनी शहाजी बापूंना काय झाडी, काय डोंगर हा डायलाॅग बोलायला लावला. शहाजीबापूंनीही त्यांच्या विनंतीला मान देत हा डायलाॅग मराठी भाषेसह नंतर इंग्रजीतदेखील बोलून दाखवला. यावेळी शहाजीबापूंसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. शिवाय शहाजीबापूंना ते प्रोत्साहितदेखील करत असल्याचे दिसून आले.

…म्हणून कामाख्या देवीच्या दर्शनाला 

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार आणि खासदारांनी शनिवारी गुवाहाटीला जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तीन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या उठावानंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटीला सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. आमचे प्रयत्न सफल होऊ देत, असे साकडेदेखील कामाख्या देवीला घालण्यात आले होते. त्यामुळेच मुख्यंत्री बनल्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे आपल्या सहका-यांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आहेत.

महाराष्ट्रात आसाम भवन तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन बनवणार

रेडिसन ब्ल्यू या हाॅटेलमध्ये सर्व आमदार खासदारांच्या समोर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. शिंदे गटातील आमदार, खासदारांना आसाम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी  महाराष्ट्र सदन आसाममध्ये उभारण्याचे तसेच, महाराष्ट्रात आसाम भवन उभारण्याची घोषणा या बैठकीत केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.