राहुल गांधी जसे बोलतो तेव्हा त्याच्या मागे आर डी बर्मन बोलतो आहे की काय हेच कळत नाही, वीर सावरकर यांच्यावर बोलायची तुझी लायकी आहे का? सावरकरांना कुठे ठेवले होते, काय हालअपेष्टा सहन केल्या, माहिती तरी आहे का?, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांच्यावर घणाघाती हल्ला केला.
सावरकरांची ती स्ट्रॅटेजी होती
भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली, तेव्हा राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली असा मुद्दा मांडून त्यांच्यावर टीका केली होती. त्याचे देशभर पडसाद उमटले. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात या विषयाला हात घातला. राज ठाकरे म्हणाले कि, राहुल गांधी म्हणे सावरकरांनी माफी मागितली, एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते कि नाही? त्याचा जरा विचार करा. सर सलामत तो पगडी पचास. ५० वर्षे शिक्षा झालेला माणूस त्यांना कसेही करून बाहेर पडून पुन्हा कार्यरत होण्याची त्यांची योजना होती. त्याला कृष्णनीती म्हणतात. शिवरायांनीही मिर्झा राजे यांना गड किल्ले दिले, ते काय चितळेंची बर्फी होती का? काय करायचे होते गड – किल्ले दिले असे लिहून? ते परत मिळवता आलेच ना, पण तोवर संकट टळले. ही योजना ज्याला समजत नाही, तो गुळगुळीत मेंदुचा, असेही राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा ‘भारत जोडो यात्रे’त आता ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा?)
राष्ट्रपुरुषांची बदनामी थांबवा
पंडित नेहरू, गांधी किती वाईट होते, हे सांगणेही थांबवा. दोन्ही बाजूंनी राष्ट्रपुरुषांची बदनामी करून काय मिळणार? या देशासमोर जे प्रश्न उभे आहेत, या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे अनेक मोहल्ले उभे राहत आहेत हे विषय गांभीर्याने न घेता आपण आपल्याच राष्ट्रपुरुषांची बदनामी करत आहे. भविष्यातील पिढी कोणाला आदर्श मानणार, कोण कुणाकडून काय शिकणार? सारखे दोष काढायचे नसतात त्यांच्यातीळ गुणही पहा, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community