मोबाईल चोरांचे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ सभा, गर्दीच्या ठिकाणी करताहेत चोऱ्या

169
मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये होणारे मोठे इव्हेंट जसे की राजकीय सभा,मेळावे, मिरवणुका, मोर्चे, मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम यावर मोबाईल चोर लक्ष ठेवून आहेत. या कार्यक्रमात  होणा-या गर्दीत मिसळून लोकांचे मोबाईल फोन चोरी करण्याचा नवीन फंडा मोबाईल चोरांनी अवलंबला आहे. पब्लिक इव्हेंटमध्ये कसे मिसळायचे याचे मॅनेजमेंट या टोळ्या एकत्र येऊन करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.
मुंबईतील वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानात नुकत्याच झालेल्या ‘डीजे स्नेक’ या कार्यक्रमात मोबाईल चोर टोळ्यांनी चक्क ६० ते ६५ महागडे मोबाईल फोन चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी एका मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून १५ महागडे मोबाईल फोन जप्त केले आहेत. शनिवारी रात्री वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानात जगातील प्रसिद्ध फ्रेंच देशातील ‘डीजे स्नेक’ याचा इव्हेंट पार पडला.
या इव्हेंटचे तिकीट ऑनलाइन बुक करून हजारो चाहत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. चाहत्यासोबत मोबाईल फोन चोर टोळीनेदेखील ऑनलाइन तिकीटे खरेदी करून या इव्हेंटमध्ये प्रवेश मिळवला आणि या इव्हेंटमध्ये डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुण तरुणीचे महागडे फोन चोरी करून या चोरट्यांनी इव्हेंट संपण्याच्या अगोदरच पळ काढला. मोबाईल फोन चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर अनेकांनी बीकेसी पोलीस ठाणे गाठून आपल्या तक्रारी दाखल केल्या.
पोलिसांनी एकूण ६ गुन्हे दाखल करून त्यात ६० ते ६५ जणांचे महागडे मोबाईल फोन चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली तर अनेकांनी मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
दरम्यान पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या मोबाईल चोरांचा शोध घेतला असता मोशिन शेख नावाच्या एका मोबाईल चोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे पोलिसांना १५ मोबाईल फोन सापडले. मोसीन हा भिवंडी येथे राहणारा असून त्याने देखील या इव्हेंटचे ऑनलाइन तिकीट खरेदी केले होते अशी माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, मोबाईल चोरांचे एक मोठे सिंडिकेट असून हे सिंडिकेट शहरामध्ये होणाऱ्या इव्हेंटवर लक्ष ठेवून असतात. तसेच सभा, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी कसे चोरायचे याचे त्यांना धडेदेखील दिले जातात. हा मोबाईल चोर टोळीचा  इव्हेंट मॅनेजमेंटचा एक हिस्सा असल्याचे मानले जाते, असे एका पोलीस अधिका-याने सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.