वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो १ च्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबरपासून मेट्रो १ प्रवाशांच्या सेवेत सकाळी साडेपाचपासून दाखल झाली आहे. आतापर्यंत पहिली मेट्रो ट्रेन ही साडेसहाला सुटत होती परंतु आता या वेळेत बदल करण्यात आला असून पहिली ट्रेन सकाळी साडेपाचला सोडण्यात येणार आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ प्रवाशांना ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा, फक्त २० रुपयात फिरा, कुठे कराल नोंदणी?)
मेट्रो सेवा सकाळी ५.३० पासून सुरू होणार
मेट्रोची सेवा २८ नोव्हेंबरपासून पहाटे साडेपाच ते रात्री १२.०७ पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. वर्सोवा आणि घाटकोपर स्थानकावरून सकाळी साडेपाचला पहिली मेट्रो सुटेल मात्र रात्रीच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती एमएमओपीएलने दिलेली आहे.
व्हॉट्सअॅपवर मेट्रो तिकीट
दरम्यान आता प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर मेट्रो तिकीट उपलब्ध होणार आहे. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना ९६७०००८८८९ या क्रमांकावर संदेश पाठवावा लागणार आहे. यानंतर प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर लिंक येईल याद्वारे प्रवासी ई-तिकीट खरेदी करू शकतात. स्मार्ट फोनवरून मुंबई मेट्रो वन ई-तिकीट खरेदी करण्यासाठी फक्त व्हॉट्सअॅप वापरणे आवश्यक आहे. या तिकिटावर क्यू आर कोड सुद्धा उपलब्ध असणार आहे. या नव्या योजनेमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे.