आजपासून सरकारी रुग्णालयात परिचारिकांचा संप ? जाणून घ्या सरकारी रुग्णालयातील परिस्थिती

141

सरकारी रुग्णालयात ३० नोव्हेंबरपासून परिचारिकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. बदलीवर आक्षेप नोंदवत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांनी हा संप पुकारला. मात्र बदलीविरोधात त्यांनी न्यायालयात घेतलेली धाव फोल ठरल्याने आंदोलनाला सुरुवात होण्याअगोदरच उतरती कळा लागली आहे. मंगळवारी परिचारिकांनी कामबंद आंदोलन करुन रुग्णसेवेला धक्का पोहोचवल्यास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय कारवाईच्या तयारीत असल्याचे समजते.

मंगळवारी राज्यातील विविध सरकारी रुग्णालयात परिचारिका आंदोलनात सहभागी होतील मात्र दुस-या दिवशी ३० नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु होईल. या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना ठाम असल्याचे समजते. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाने रात्री उशिरा जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मनिषा शिंदे यांची बदली रद्द होण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती. मात्र शिंदे यांची बदली थांबवण्याची याचिका न्यायालयाने मान्य केली नाही. सरकारी रुग्णालयातील अधिष्ठात्यांनी परिचारिकांना संपात सहभागी होण्यापासून थांबवावे, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाने केली आहे. तर दुसरीकडे रुग्णसेवेचा विचार करता परिचारिकांनी संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन परिचारिकांची जुनी संघटना असलेल्या महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनने केले आहे.

( हेही वाचा: मुंबईत गोवरमुळे मृत्यूचे सत्र सुरुच, आता गोवरप्रतिबंधासाठी मिळणार लसीकरणाची अतिरिक्त मात्रा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.