महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर दोन्ही राज्ये आमनेसामने आली आहेत. आता संजय राऊत यांना बेळगावच्या न्यायालयाने समन्स बजावले. 1 डिसेंबरला बेळगाव न्यायालयात हजर होण्याचे समन्स संजय राऊत यांना बजावण्यात आले आहे. 30 मार्च 2018 ला बेळगाव येथे प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तर बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला करुन अटक करण्याचा डाव आहे. अशी शंका राऊत यांनी व्यक्त केली आहे. जे लढणारे लोक आहेत, त्यांना वाॅरंट पाठवले जाते. अटकेची भीती दाखवली जाते. शिवसेना घाबरणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
…तर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटणार
तुम्हाला काय तुरुंगात टाकायचे ते टाका. मी घाबरणार नाही. सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने यापूर्वी हुतात्मे दिले आहेत. मी 70 वा होण्यास तयार आहे. यामागे आपल्यावर हल्ला करण्याचे कारस्थान आहे. कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबले तर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
( हेही वाचा: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; ‘हे’ आहे कारण )
माझ्याविरोधात कारस्थान
2018 साली केलेल्या भाषणाची आता दखल घेऊन त्यांनी मला न्यायालयात हजर राहायला सांगितले आहे. याचा अर्थ असा की, बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात टाकावे, अशा प्रकारचे कारस्थान सुरु असल्याचे माझ्या कानावर आले आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.