‘हंसी तो फसी’ तून झाला गैरसमज एका ‘स्माईल’ ने त्याला पाठवले तुरुंगात

151
मुलीने आपल्याकडे बघून ‘स्माईल’ दिली,या गैरसमजुतीतून दोन तरुणांना तुरुंगात जावे लागल्याचा प्रकार अंधेरी पश्चिम येथे घडला. १५ वर्षाच्या दोन शाळकरी मुली आपल्याकडे बघून हसल्या म्हणून दोन तरुणांनी त्या दोघींचा पाठलाग केला आणि या मुलींना चिठ्ठी दिली. याप्रकरणी दोन तरुणांपैकी एकाला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे.
सलमान हनिफ कुरेशी (३०) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.जोगेश्वरी पश्चिम गोमती नगर या ठिकाणी राहणारा सलमान हा उत्तर प्रदेश येथून आलेला मित्र जिशान याच्यासोबत शनिवारी दुपारी अंधेरी पश्चिम आझाद नगर, पोस्ट ऑफिसजवळ मर्सडीज या महगड्या मोटारीजवळ उभे होते. त्याचवेळी १५ वर्षांच्या दोन शाळकरी मुली ट्युशन वरून जोगेश्वरी येथे घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. या दोघांचे लक्ष या मुलींकडे होते. दोघी मैत्रीण हसत हसत गप्पा मारत असताना सलमान याला वाटले की, त्यांनी आपल्याकडे बघून स्माईल दिली, म्हणून सलमानने हात उंचावून दोघींना इशारा करून दोघींचा पाठलाग सुरू केला.
आपल्यामागे कोणीतरी लागले असल्याचे दोघींच्या लक्षात आले आणि दोघी घाबरल्या. त्या दोघी थेट रिक्षा करून घरी जाण्यास निघाल्या, सलमान आणि त्याचा मित्र जिशान यादोघांनी मर्सडीज मोटारीतून दोघींच्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला.
रिक्षा सिग्नलवर थांबताच सलमान हा मोटारीतून खाली उतरला व त्याने रिक्षात बसलेल्या मुलींकडे एक चिठ्ठी टाकून निघून गेला.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलींनी हा प्रकार आपल्या घरी येऊन सांगितला. मुलीच्या वडिलांनी ताबडतोब आंबोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. आंबोली पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध विनयभंग, पाठलाग करणे आणि पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेऊन सलमान कुरेशी याला गोमती नगर येथून अटक करून अपराध करताना वापरलेली मर्सडीज मोटार जप्त केल्याची माहिती वपोनी. बंडोपंत बनसोडे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.