राज ठाकरे भाजपची नव्हे तर बाळासाहेबांची भाषा बोलत आहेत

153

राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर विरोधकांनी आरोप केले की राज ठाकरे हे भाजपची भाषा बोलत आहेत. राज यांनी आपल्या भाषणामध्ये भगतसिंह कोश्यारींपासून उद्धव ठाकरे व राहुल गांधींचाही समाचार घेतला. मागे एकदा त्यांनी कॉंग्रेस संस्कृतीप्रमाणे नरेंद्र मोदींवर गलिच्छ आरोप करुन पाहिले होते. परंतु जनतेने त्यांच्या पक्षाचा पराभव करुन योग्य शब्दांत उत्तर दिलं. इतकंच काय तर त्यांच्या दादर निवास्थाजवळ पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर लोकांनी मोदींचा जयजयकार केला आणि मोदींवरील त्यांची टीका आपल्याला आवडली नसल्याचे म्हटले.

राहुल गांधी सावरकरांवर गलिच्छ टीका करतात. लोकांना हे मुळीच आवडत नाही. माझं मत स्पष्ट आहे, तुम्ही कुणावरही टीका करु शकता. परंतु त्यात गलिच्छता नसावी आणि सप्रमाण टीका व्हावी, वाह्यात आरोप नव्हे. आता राज ठाकरे मोदींवर टीका जरुर करतात, परंतु आपली जीभ घसरु देत नाहीत. यावरुन लगेच ते भाजपची भाषा बोलतात असे समजण्याचे कारण नाही.

राज ठाकरे हे सभेत टीका करताना बर्‍याचदा कठोर शब्दांचा वापर करतात. परंतु अनेकांना माहित आहे की राज ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. सभेत जरी टीका केली तरी वैयक्तिक आयुष्यात कोणतेही हेवेदावे ते ठेवत नाहीत. उद्धव ठाकरेंवरील टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आणि मीडियानेदेखील या टीकेचा उगाच बाऊ केला. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणावर टीका केली नसून त्यांनी झटकलेल्या जबाबदारीवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या आजारपणाबद्दल सर्वांनाच वाईट वाटतं. परंतु तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर आजारपणाचं कारण देऊ शकत नाहीत. मनोहर पर्रिकर यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. एकतर मुख्यमंत्रीपद सोडावं किंवा ते सक्षमपणे निभवलं पाहिजे. हे दोनच पर्याय असतात. तिसरा पर्याय नसतो. उद्धव ठाकरेंनी तिसरा पर्याय स्वीकारला. ते घरी बसून राहिले आणि एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यावर लगेच घराच्या बाहेर निघाले, राज ठाकरे यांनी या कृतीवर, या परिस्थितीवर टीका केली आहे.

( हेही वाचा: एकनाथ शिंदे यांचा हात ढाई किलोचा… )

राज ठाकरे भाजपची भाषा बोलत नसून ते बाळासाहेबांची भाषा बोलत आहेत. बाळासाहेबांचे वारसदार अशी चर्चा मीडियात होत राहते. तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार आहेत आणि राज ठाकरे हे राजकीय वारसदार आहेत. राज ठाकरे यांचा प्रवास मराठीपासून हिंदुत्वाकडे झाला आहे. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास असाच झाला. बाळासाहेबांचे सर्व गुण राज ठाकरे यांनी घेतले आहेत, उद्धव ठाकरे यांनी नव्हे. राज हे आतल्या गाठीचे नाहीत, ते बिनधास्त बोलतात. पण मनात राग ठेवत नाहीत. वर नमूद केल्यानुसार ते सभेत कठोर टीका करतात, मात्र त्याच राजकीय विरोधकाच्या मैत्रिला जागतात. बाळासाहेब व्यंगचित्रकार होते तर राजदेखील व्यंगचित्रकार आहेत. त्याचबरोबर दोघांमधील आणखी एक साम्य म्हणजे दोघेही कलेचे उपासक, जाणकार… आता राज ठाकरे शरद पवारांना बळी पडणार नाहीत. आता राज ठाकरे कुणाचीच भाषा बोलणार नाहीत. राज ठाकरे जी भाषा बोलतील, ती भाषा बाळासाहेबांच्या जवळची असणार आहे. ठाकरे गट लवकरच मनसैनिक होण्याच्या मार्गावर आहे. कारण ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब दिसतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.