गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी 1 डिसेंबर रोजी 89 जागांवर मतदान होणार आहे. याठिकाणी मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी प्रचार थांबला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 788 उमेदवार रिंगणात आहेत.
(हेही वाचा – पुणेकरांना दिलासा! पुणे स्टेशन बस सेवा पुन्हा सुरू, ‘या’ 8 मार्गांवर PMPML धावणार)
गुजरातमध्ये नुकतीच झालेली पूल दुर्घटना झालेल्या मोरबीसह कच्छ, राजकोट, पोरबंदर आणि जुनागड येथे या टप्प्यात मतदान होत आहे. एकूण 19 जिल्ह्यांमधील 2 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यातील सर्व जागांवर भाजप आणि काँग्रेस निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. समाजवादी पक्ष 57 तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने 6 उमेदवारांना तिकिट दिले आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी राज्यातील 3 जिल्ह्यात 4 प्रचार सभा घेतल्या. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भावनगर येथे रोड शो केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मांडवी आणि गांधीधाम येथे प्रचार केला. गेल्या 20 दिवसात भाजपने 160 हून अधिक सभा, रॅली आणि रोड-शो केले आहेत. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात एकुण 4.6 लाख मतदार आहेत. भाजपने विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर केले आहे. तर काँग्रेस आणि आपने मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा उल्लेख केलेला नाही. पण काँग्रेसकडून भरत सोलंकी, अर्जुन मोढवाडिया, शक्तिसिंह गोहिल हे तर आपमध्ये गोपाल इटालिया आणि इशुदान गढवी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.
Join Our WhatsApp Community