सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव टोल नाक्यावर 1 डिसेंबर पासून टोल वसुली सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची नोटीस जाहीर करण्यात आली असून, पूर्वी ठरवून दिलेल्या दरानुसारच ही टोल वसुली करण्यात येणार आहे. याकरिता गणेश गढिया कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोल माफी मिळावी या मागणीकडे तूर्तास पुरते दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 1 डिसेंबरपासून पुन्हा एकदा ओसरगाव नाक्यावर टोल भरावा लागणार आहे.
( हेही वाचा : श्रद्धा हत्याकांड : झोमॅटो डिलिव्हरीच्या तारखांमुळे मोठा ट्विस्ट, आफताबचा खोटारडेपणा उघड )
सिंधुदुर्ग ओसरगाव टोलनाक्यावर असे असतील दर
ओसरगाव टोलनाक्यावरून जाणाऱ्या कार, जीप, व्हॅन आदी लाईट मोटर व्हेईकलच्या सिंगल एन्ट्रीसाठी 90 रूपये तर एका दिवसांत जाण्या-येण्यासाठी 135 रूपये दर ठेवण्यात आला आहे.
हलकी व्यवसायिक वाहने, मोठी मालवाहू वाहने, मिनीबससाठी सिंगल एन्ट्री 145 रूपये आणि जाण्या – येण्यासाठी 220 रूपये, ट्रक आणि बससाठी (दोन ॲक्सल) 305 आणि जाण्या-येण्यासाठी 460 रूपये, तर थ्री ॲक्सल व्यावसायिक वाहनांसाठी 335 आणि जा – ये करण्याकरिता 500 रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच या सर्व वाहनांसाठी मासिक पासचेही दर निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान ओसरगाव टोलनाक्यापासून 20 किलोमीटर परिघातील वाहनांना टोलनाक्यातील रक्कमेत 50 सूट देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यात MH 07 पासिंगची वाहने व वीस किलोमीटर परिघातील जिल्हा अंतर्गत नोंदणीकृत व्यवसायिक असलेल्या कार, जीप, व्हॅन आदींसाठी 45 रूपये, मिनीबससाठी 75 रूपये, ट्रक आणि बससाठी 155 रूपये तर थ्री ॲक्सल वाहनांसाठी 165 रूपये, चार ते सहा मल्टी ॲक्सल वाहनांसाठी 240 रूपये आणि त्यापुढील अवजड वाहनांसाठी 290 रूपये असा एकेरीच्या 50 टक्के मर्यादित पास असणार आहे. वीस किलोमीटर परिघातील व MH07 पासिंगच्या स्थानिक वाहनांसाठी 315 रूपयांचा मासिक पास दर निश्चित करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community