मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण झाला. या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला.
( हेही वाचा : सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणार आधुनिक उपचार! वैद्यकीय उपकरणांसाठी 19 कोटी रूपये मंजूर)
भुयारीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण
मेट्रो-३ मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचे काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ ने यशस्वीरित्या पूर्ण केले.
“आज मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचे काम १००% पूर्ण झाले या क्षणाचे साक्षीदार होताना याचा मला अतिशय आनंद होत आहे. हा मार्ग मुंबईच्या ऐतिहासिक वारसा इमारती, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याचा मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, नदी व कठीण भौगोलिक रचना असलेला परिसर आदींच्या खालून व अगदी जवळून जात असल्याने मेट्रो-३ साठी भुयारीकरण करणे खूपच आव्हानात्मक होते”, असे मत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.
“आम्ही कामगारांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता आधुनिक तंत्रज्ञान वापरले. प्रकल्प सल्लागार कंत्राटदार मुं.मे.रे.कॉ. च्या संपूर्ण टीमसाठी हे एक जिकिरीचे काम होते. मेट्रो-३ हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल”,असे मत मुं.मे.रे.कॉ.चे संचालक (प्रकल्प) श्री. एस.के. गुप्ता यांनी व्यक्त केले. मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पाचे एकूण ७६.६% काम पूर्ण झाले आहे.
Join Our WhatsApp Community