मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांसाठी १० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान स्वनिधी योजना राबवण्यात येत आहे. येत्या ३ डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबई महापालिकेला १ लाख फेरीवाल्यांचे अर्ज भरुन घ्यायचे आहेत. परंतु ३० नोव्हेंबरपर्यंत ४० हजार फेरीवाल्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, पुढील तीन दिवसांमध्ये ६० हजार फेरीवाल्यांचे अर्ज भरुन घेण्याचे टार्गेट आहे.
त्यामुळे ९ नोव्हेंबरपर्यंत २४ हजार फेरीवाल्यांचे अर्ज भरुन घेणाऱ्या महापालिकेला २२ दिवसांमध्ये केवळ १६ हजार अर्ज भरुन घेता आले, तिथे ३ दिवसांमध्ये ६० हजार अर्ज स्वीकारण्याचे टार्गेट महापालिकेला कसे शक्य होईल,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(हेही वाचाः रस्ते कंत्राटदाराची महापालिकेने केली यांत्रिक वाहनतळाच्या कामासाठी निवड)
महापालिकेला मिळालेले अर्ज
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथ विक्रेत्यांसाठी सुक्ष्म पुरवठा म्हणून दहा हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. केंद्राची ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबवली जात आहे. मुंबई महापालिकेला ९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत २४ हजार ९४९ फेरीवाल्यांचे या सुक्ष्म पुरवठ्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ११ हजार १४३ फेरीवाल्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते, तर ८ हजार ७० फेरीवाल्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. ८ हजार २९९ फेरीवाल्यांशी संपर्क न झाल्याने पुन्हा त्यांच्याशी बँकेच्या माध्यमातून संपर्क साधला गेला होता. तसेच ५ हजार ४५७ प्रकरणे बंद करण्यात आली होती.
अर्ज भरण्याला युद्धपातळीवर सुरुवात
फेरीवाल्यांचा पंतप्रधान स्वनिधी योजनेला मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता केंद्राने महापालिकेला ही योजना पुन्हा युध्दपातळीवर राबवण्याचे निर्देश दिल्यानंतर, ३ डिसेंबर २०२२ पर्यंत १ लाख फेरीवाल्यांचे अर्ज भरुन घेत त्यांना या निधीचा लाभ मिळवून देण्याचे टार्गेट दिले होते. बँकांकडून फेरीवाल्यांचे नाकारले जाणारे अर्ज पाहता बँकांच्या नियमांमध्ये शिथिलता आणत मुंबईतील २४ विभाग कार्यालयांमध्ये अर्ज भरुन घेण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे १० नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत ४० हजार फेरीवाल्यांचे अर्ज स्वीकारुन त्यांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः महापालिका अधिकारी फेरीवाल्यांपुढे हतबल: जावळे मार्गाचे काम धीम्या गतीने सुरू)
मुदतवाढ की योजना गुंडाळणार?
येत्या ३ डिसेंबरपर्यंत १ लाख फेरीवाल्यांना या निधीचा लाभ देण्याचे टार्गेट पूर्ण करायचे असल्याने पुढील ३ दिवसांमध्ये महापालिकेला ६० हजार फेरीवाल्यांचे अर्ज स्वीकारुन त्यांना या योजनेचा लाभ देता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महापालिकेला मुंबईत ५० हजारांच्या पुढे या योजनेचा लाभ फेरीवाल्यांना देता येणार नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेला या पंतप्रधान स्वनिधीचा लाभ देण्यासाठी योजनेचे टार्गेट पूर्ण करण्याकरता मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासन आता मुदतवाढ देते की ही योजना ३ डिसेंबरला गुंडाळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Join Our WhatsApp Community