बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर- शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-2 ( कामठी मार्ग) व रिच-4 ( सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेही उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्यापूर्वी नागपूर व पुणे मेट्रो तसेच नाशिक मेट्रो निओच्या दुस-या टप्प्याला केंद्र सरकार मंजुरी देण्याची शक्यता आहे. उद्घाटनाआधी नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग पुर्णत: तयार होईल, असे रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.
3 आठवड्यांत दोनदा नागपूर दौरा
इंडियन सायन्स काॅंग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान 3 जानेवारीला नागपुरात येणार आहेत. त्यावेळी समृद्धी आणि नागपूर मेट्रो सुरु होईल, अशी अपेक्षा होती, मात्र, पंतप्रधानांनी तीन आठवड्यांच्या कालावधीत दोनदा शहरात येण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा: ‘ही’ नाणी लवकरच होणार बंद; नुकसान होण्याआधीच बँकेत करा जमा )
असा असेल दौरा
- पंतप्रधानांच्या दौ-यासंदर्भात प्रशासनातील अधिका-यांकडून बैठकांची सत्रे सुरु आहेत.
- सुरक्षाव्यवस्था व इतर प्रशासकीय व्यवस्थांचा आढावा घेण्यात येत आहे.
- पंतप्रधान कार्यालयाकडून नेमका कार्यक्रम लवकरच येईल, अशी माहिती समोर आली आहे.