गोवरमुळे भिवंडीत अजून एक तर ठाण्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत आतापर्यंत ३ जणांचा गोवरमुळे मृत्यू झाला असून, राज्यात आतापर्यंत १८ रुग्णांनी गोवरमुळे आपला जीव गमावला आहे. गुरुवारच्या नोंदीत राज्यात आता ७४५ गोवरचे रुग्ण असून, तब्बल १२ हजार २४१ संशयित रुग्ण आढळले आहे. राज्यात वाढत्या गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ११ सदस्य असलेल्या टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश गुरुवारी दिले. राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ सुभाष साळुंके या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील.
(हेही वाचा – MSRTC: ‘एसटी’ने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता रेल्वेप्रमाणे कळणार ‘लालपरी’चं Live लोकेशन!)
मुंबई महानगर भागांतील मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांसह वसई-विरार, मीरा-भाईंदर, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातही गोवरचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मीरा-भाईंदर शहर तसेच रायगड जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळले आहेत. मीरा भाईंदर येथील काशीगाव येथे ३ गोवरचे रुग्ण आढळले आहेत. या भागांत १७२ संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. रायगड येथील खालापूर येथे ६ गोवरचे रुग्ण सापडले आहेत. ११५ गोवरचे संशयित रुग्ण आहेत. तर राज्यात एकूण ८९ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे.
जिल्हा आणि मनपानिहाय १८ गोवरच्या रुग्णांचा मृत्यूबाबतची माहिती
- मुंबई – १२
- भिवंडी – ३
- ठाणे – २
- वसई-विरार – १