मुंबई महापालिकेच्या आगामी सावत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत युती करण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही निश्चित आहे. परंतु काँग्रेस पक्षाने वारंवार स्वबळाचे नारे दिल्यानेआजही तो पक्ष युतीबाबत तळ्यात मळ्यात आहे. मात्र असे असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीचा नवीन भिडू शोधल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांकडून पुन्हा एकदा शिवसेनेसोबत युती व्हावी अशी इच्छा प्रकट होऊ लागली आहे. वंचित महाविकास आघाडीत सहभागी होत असल्याने काँग्रेसला शिवसेनेसोबत युती केल्याशिवाय पर्याय दिसत नाही. काँग्रेसचा प्रमुख मतदार असलेला मुस्लिम मतदार हा भविष्यात शिवसेना व वंचित आघाडी सोबत गेल्यास काँग्रेसला पराभवाची नामुष्की सहन करावी लागेल, ही शक्यता लक्षात घेता त्यांना युतीत सहभागी होणे गरजेचे असल्याचे वाटत आहे.
( हेही वाचा : EWS कोट्यातून देण्यात येणाऱ्या नियुक्तीपत्रांना उच्च न्यायालयाची स्थगिती )
मुंबई महापालिकेची सावत्रिक निवडणुकीबाबत अध्यापही कोणतेही स्पष्ट निर्देश नसले तरी येत्या काही दिवसांत न्यायालयाच्या निर्देशानंतर ही निवडणूक पार पडेल. मुंबईतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे तुकडे होऊनशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्ष स्थापन झाले असून शिवसेनेचे धनुष्यबाण कुणाचे यावर याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. परंतु अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल आणि शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेने आतापासून मशाल चिन्हाची ओळख मतदारांमध्ये निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
मात्र आगामी निवडणुकीत पक्ष फुटीचा तसेच चिन्हाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा निर्धार पक्का केला आहे. आगामी काळात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या युतीला रोखण्यासाठी शिवसेनेने यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी केली होती. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस पक्ष येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत जाईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहेत. मात्र, आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेसोबत युती हवी असल्याने दोन्ही पक्षांनी आपली युती आधीच जाहीर केलेली आहे.
मात्र बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत भाजपची युतीही केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घोषित केल्याने या युतीमुळे भविष्यात शिवसेनेचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी जुळवून घेण्याचा निर्धार केला आहे. आणि काही दिवसापूर्वी प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी दोन्ही पक्षांचे प्रमुख एकाच व्यासपीठावर दिसले आणि भविष्यातील शिवसेना आणि बहुजन वंचित आघाडीच्या युतीची नांदी पटवून दिली. त्यामुळे भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत वंचित आघाडी ही दिसेल असे बोलले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून काँग्रेसने स्व बळाचा नारा देत आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे राज्यात सरकार स्थापनेच्यावेळी महाविकास आघाडी केली असली तरी महापालिकेत ही महाविकास आघाडी नसल्याचे या काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि तत्कालिन महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा हे वारंवार सांगत आले आहेत.
त्यातच आता वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत सहभागी झाल्याने काँग्रेस पक्षानेही युतीत सहभागी व्हावे अशाप्रकारची भावना त्यांच्या नेत्यांकडूनही व्यक्त होत आहे. आजवर काँग्रेसचे नेते स्वबळाची भाषा करत असले तरी महापालिका निवडणुका या महाविकास आघाडीमध्ये लढल्या जाव्यात अशाप्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाचे २९ नगरसेवक होते, तर शिवसेनेचे ९७ नगरसेवक होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक होते. त्यामुळे शिवसेनेसोबत युती करून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी किमान ३५ जागांवर आपला दावा ठोकला आहे. तर शिवसेनेचे ९७ नगरसेवक असल्याने शिवसेना किमान १२५ जागांवर तडजोड करू शकते. शिवसेना-भाजप युती असताना शिवसेना १६३ जागांवर निवडणूक लढवत होती. परंतु आता चार पक्ष एकत्र आल्यास आणि अर्धी शिवसेना फुटल्याने शिवसेनेला विद्यमान नगरसेवकांच्या तुलनेत २५ जागा जास्त मिळाव्यात अशी अपेक्षा असेल. त्यामुळे शिवसेना पक्ष १२५ जागांवर निवडणूक लढवू शकते,असा अंदाज वर्तवला जात आहे. तर काँग्रेस पक्षाचे २८ नगरसेवक असल्याने त्यांना याच्या दुप्पट म्हणजे ६५ ते ७० जागा मिळू शकतात. त्यामुळे काँग्रेसला जर एवढ्या जागा सोडायच्या झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान १५ जागा कमी कराव्या लागतील. वंचित बहुजन आघाडीला किमान २० ते २५ जागा सोडाव्या लागतील. आज वंचित बहुजन आघाडीचा एकही नगरसेवक नसला तरी किमान त्यांना या निवडणुकीत युतीच्या मदतीने नगरसेवकाचे खाते उघडू शकतात. वंचित बहुजन आघाडी २० ते २५ जागांवर तडजोड करण्यास तयार होतील असे बोलले जात आहे.
ही सांख्यिकी गणित मांडली जात असली तरी प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांना २२७ ऐवजी केवळ ६५ ते ७० जागांवर निवडणूक लढवणे हे काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून धोक्याचे मानले जात आहे . त्यामुळे काँग्रेस पक्ष हा कोणत्याही परिस्थितीत एवढ्या कमी जागांवर तडजोड करायला तयार होणार नाही. परंतु काँग्रेसच्या एका गटाचे असे म्हणणे आहे की २९ नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आल्याने आता कमी जागांमध्ये जास्त नगरसेवक युतीत निवडून येवू शकतात. आजच्या परिस्थितीत स्वबळावर काँग्रेसचे नगरसेवक निवडून येणे कठिण आहे. त्यामुळे युतीत सहभागी होऊन मागील निवडणुकीपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू शकतो,असे काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे.
तर मुस्लिम मतदार काँग्रेसच्या प्रमुख मतदान आहे, पण तो म्हणजे मुस्लिम मतदार शिवसेना,राष्ट्रवादी आणि वंचितची युती झाल्यास काँग्रेसपासून दूर जाईल, त्यामुळे याचा फटका काँग्रेस पक्षाला बसू शकतो. त्यामुळे स्वबळावर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता कमी आहे आणि त्यातच परंपरागत मतदार दुसऱ्या पक्षाकडे वळल्यास याचा अधिकच फटका काँग्रेसला पक्षाला बसण्याची भीतीही काही नेत्यांकडून वर्तवली जात आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती केल्यास काँग्रेसलाही युतीत सहभागी झाल्याशिवाय पर्याय उतरणार नसून मागील वेळच्या नगरसेवकांची संख्या कायम राखणे किंवा वाढवायची असल्यास युतीशिवाय पर्याय नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे असून वंचितने काँग्रेसला आता शिवसेनेसोबत युती करण्यासाठी विचार करण्यास भाग पाडल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनाच वाटू लागले आहे.
Join Our WhatsApp Community