ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नव्या हृदयासाठी धडपडणा-या नवरतन लोढा या ४४ वर्षीय व्यावसायिकाला प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतून नवे आयुष्य मिळाले. या रुग्णासाठी खास पुण्यातून दोन तासांत ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून हृदय आणण्यात आले. हृदय वेळेवर मिळाल्याने प्रत्यारोपण शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण पाचव्या दिवसांतच पुन्हा पायावर उभा राहिला. या रुग्णामध्ये बरीच सुधारणा दिसून आल्याचे डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.
( हेही वाचा : मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा )
भाईंदर येथे राहणा-या नवनाथ लोढा या व्यावसायिकाला गेल्या पाच वर्षांपासून श्वसनाचा त्रास होत होता. दोन वर्षांपूर्वी त्यांचे हृदयही कमकुवत होत असल्याचे तपासाअंती समजले. दैनंदिन व्यवहारातही अडथळे येत असल्याने त्यांना व्यवसायही सोडावा लागला. तपासणीदरम्यान त्यांच्या हृदयाची धडधड दहा टक्क्यांनी कमी झाल्याचे समजले. अखेर लोढा यांना नव्या हृदयाची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी त्यांना दिली. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवे हृदय मिळवता येते, ही माहिती लोढा यांच्यासाठी थोडी भीतीदायकच होती. अखेरिस त्यांनी हृदय प्रत्यारोपणाला होकार दिला.
ऐन दिवाळीत पुण्यात एका मृत रुग्णाकडून कुटुंबीयांनी हृदय दान करण्यास डॉक्टरांना संमती दिली. पुण्यातून हृदय उपलब्ध होत असल्याची माहिती मिळताच ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉक्टरांची टीम खास पुण्यात गेली. सणासुदीच्या काळात मुंबई-पुणे महामार्ग संपूर्ण ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना रुग्णवाहिका जाण्यासाठी सर्वांनी तातडीने वाट मोकळी करुन दिली. परिणामी, पुण्यातून हृदय केवळ दोन तासांतच ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात पोहोचले. लोढा यांच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तब्बल ८ ते ९ तास सुरु होती. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी लोढा यांच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.
लोढा यांना दोन आठवड्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला. आतापर्यंत त्यांनी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दोनदा भेट देत डॉक्टरांना त्यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. रुग्णाला किमान तीन महिने घरात आराम करावा लागेल. प्रत्यारोपण शस्रक्रियेनंतरही होणा-या संसर्गापासून वाचण्यासाठी त्यांना घरात तीन महिने आराम करायचा असतो. या रुग्णांना सकस आहार, पथ्य तसेच आयुष्यभर औषधांचे सेवन करावे लागते.
Join Our WhatsApp Community