महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करून अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लवकरच कार्यमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पाच डिसेंबर रोजी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात, विशेषतः भाजपाच्या गोटात ऐकायला मिळत आहे.
कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भाजपाचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता कोश्यारी यांना फारकाळ राज्यपाल पदावर ठेवणे भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब केंद्रीय नेतृत्त्वाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळेच कोश्यारी यांच्या उचलबांगडीचे संकेत मिळत आहेत.
दोन्ही बाजुंनी अडचण
१९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीने भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात निषेध प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला अथवा नाकारला, तरी दोन्ही बाजूने अडचण होणार आहे. त्यामुळे त्याआधीच कोश्यारी यांना कार्यमुक्त केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. हा निर्णय याआधीच होणार होता; मात्र गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे, निवडणूक सुरू असताना कोश्यारी यांना पायउतार केले, तर त्याचा फटका बसू शकतो, याची भाजपला धास्ती आहे. त्यामुळे ५ डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community