“पश्चिम उपनगरातील ‘के/पश्चिम’ व ‘पी / दक्षिण विभागाच्या सीमांना जोडणाऱ्या मार्गावर आता महापालिकेच्यावतीने पूल उभारला जाणार आहे. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स आणि गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर आदी भागांना जोडणारे हे पूल गोरेगाव खाडीवर केबल स्टेडद्वारे बांधले जाणार आहे. या पुलाच्या बांधकामामुळे पश्चिम उपनगरातील या दोन्ही भागांमधील जनतेला पर्यायी वाहतुकीचा मार्ग खुला होऊन यामुळे लिंकींग रोडवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे.
( हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या सहमतीशिवाय घोषणा करू नका; मुख्यमंत्र्यांची स्वपक्षातील मंत्र्यांना सूचना)
अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स व गोरेगाव पश्चिम येथील भगत सिंग नगर येथील प्रभागांना जोडणाऱ्या पुलाचे आरक्षण सन २०१४- २०३४ च्या नवीन प्रारूप विकास नियोजन आराखडयामध्ये टाकण्यात आले होते. त्यानुसार विकास नियोजन आराखड्यातील ३६.६० मी. रुंद रस्त्यावर गोरेगाव खाडीवरील वाहतुकीसाठी केबलस्टेड पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा केबल-स्टेड पूल हा लिंक रोड आणि प्रस्तावित कोस्टल रोड यांना जोडणारा महत्वाचा जोडरस्ता ठरणार असून या केबल स्टेड पुलाच्या उभारणीमुळे या दोन्ही रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल,असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेने या पुलाच्या बांधकामाच्यादृष्टीकोनातून नेमलेल्या सल्लागार संस्थेने हे वाहतूक पूल गोरेगाव खाडीवर २३८ मी. लांबीचे केबल स्टेड पूल असेल आणि या पुलाची रुंदी २६.९५ मी. असेल अशाप्रकारची शिफारस केली आहे. हे पूल पूर्णपणे कांदळवनाने बाधित असलेल्या भागातून जात आहे. त्यामुळे या पुलासाठी आधुनिक तंत्रज्ञानानुसार स्टेनलेस स्टील प्लेट गर्डर व स्टेनलेस स्टील सळी आदींद्वारे याचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कामाची निविदा अंतिम टप्प्यात असून पुढील तीन ते साडेतीन वर्षांमध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.