राज्यपाल साफ चुकीचे बोलले आहेत. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही काही पक्ष याचा बाऊ आणि राजकारण करत आहेत. उरला प्रश्न छत्रपती उदयन राजे यांच्याविषयी, ते तर आमचे राजे आहेत. आंदोनल करण्याचा तसेच आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे, असे मत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
( हेही वाचा : चैत्यभूमीवर बसपाने आधीच अडवली अशी जागा)
भाजपाच्या दादर येथील कार्यालयात शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राऊत यांना करायचे काहीच नाही, रोज गरम हवा सोडायची आहे. त्यांनी बॉयलर उघडावा आणि कपडे सुकवावेत. सत्तेत असताना संजय राऊत यांनी बेळगावचा प्रश्न का सोडवला नाही. सत्तेत असताना भवन का नाही बांधले? त्यामुळे केवळ तोंडाची गरम वाफ बाहेर काढून यातून राज्याचे भले होईल हा त्यांचा गैरसमज आहे, असे शेलार म्हणाले.
कर्नाटकने आरे केले, तर आम्ही ही कारेने उत्तर देऊ
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूने तणावाचे वातावरण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचा पहिला अधिकार त्या गावांवर आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात त्यावर भूमिका स्पष्ट आहे. शिंदे सरकार त्या भागामध्ये अनेक योजना पोहोचवणार आहे. जत भागात पाण्याच्या संदर्भातील योजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रश्न सामंजस्याने सुटला पाहिजे. कुणी अरे केले तर आम्ही कारे करू. कर्नाटकच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा झाल्यास आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून त्याला उत्तर देऊ. कुणालाही कुठेही जाण्याची परवानगी आहे महाराष्ट्रातील मंत्री तिथे जाणार असतील तर त्यांना कोणी थांबवू शकणार नाही.
काँग्रेस डोक्यावर पडलेली
- जुन्या व्हिडीओबाबत विचारले असता शेलार म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुठल्या भागाला लकवा लागला होता, याचाही व्हिडिओ मी बाहेर काढेन.
- काँग्रेसने शिवसेनेला ‘हा वाघ नाही मांजर आहे’ असे म्हटलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे. जुन्या व्हिडीओवर प्रश्न विचारायचे असतील, तर माझ्यापेक्षा गोची तुमची होईल. त्यामुळे काँग्रेसने डोक्यावर पडल्यासारखे प्रश्न विचारू नये.