मुंबईतील वाहतूककोंडीपासून आणि रिक्षा-टॅक्सीच्या वाढत्या दरांपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी बेस्ट उपक्रम मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. मोबाईल अॅपआधारित बेस्टची ई-टॅक्सी सेवा लवकरच सुरू करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. जून २०२३ पर्यंत ५०० टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील अशी माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. ओला -उबेर यांसारख्या खासगी कंपन्यांपेक्षा याचे दर कमी असतील.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ योजना! फक्त १९९ रुपयात महिनाभर प्रवास; चलो अॅपचे नवे प्लॅन्स फक्त एका क्लिकवर…)
बेस्ट वॉटर टॅक्सी
बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून आता मुंबईकरांना वॉटर टॅक्सीनेही प्रवास करता येणार आहे. गेट वे ते बेलापूर, उरण, जेएनपीटी दरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या शिपिंग, मिनिस्ट्री, मुंबई पोर्ट ट्रस्ट मेरिटाइम बोर्ड यांच्याबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती महाव्यवस्थापकांनी दिली आहे. बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून मार्वे-मनोरीदरम्यान १९९० मध्ये वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र तेव्हा तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सुरू राहू शकली नाही.
ई-चार्जिंग सेवा
मुंबईकरांना विजेवर धावणाऱ्या वाहनांचे चार्जिंग करता यावे यासाठी मुंबईत ३३० ई-चार्जिंग केंद्र उभारण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. येत्या २-३ महिन्यांत ३३० चार्जिंग केंद्र मुंबईकरांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
बेस्टच्या कॅबने प्रवास
तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी बसचा वापर केला आणि स्टॉपपासून पुढे बससेवा उपलब्ध नसेल किंवा अनेकवेळा काही मार्गावर बस धावत नाही अशा सर्व मार्गांवर बेस्टच्या कॅबने पुढचा प्रवास करता येणार आहे. तसेच घरापासून बसस्टॉपपर्यंत येण्यासाठी सुद्धा तुम्ही या कॅबचा वापर करू शकता.
ओला-उबेरपेक्षा दर कमी असणार
या कॅबचे बुकिंग तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चलो अॅपच्या माध्यमातून करू शकता. या कॅबचे पैसै तुम्हाला ऑनलाईन भरता येतील. ही ई-कॅब तुम्हाला ओला-उबेरप्रमाणेच चलो अॅपच्या माध्यामातून बुक करता येईल. या ई-कॅबचे(इलेक्ट्रिक टॅक्सी) दर ओला आणि उबेर टॅक्सीपेक्षा कमी असतील. त्यामुळे सामान्य प्रवासी सुद्धा या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
पर्यावरणपूरक ई-कॅब (इलेक्ट्रिक टॅक्सी)
या इलेक्ट्रिक टॅक्सी पर्यावरणपूरक असून यामुळे ध्वनी प्रदूषण सुद्धा होणार नाही. कंपनीची नियुक्ती करण्यासाठी लवकरच लिलाव घेऊ ही युनिक कॉन्सेप्ट ठरेल असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community