दुधाने तोंड पोळले की माणूस ताकही फुंकून पितो, असे म्हणतात. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अलिकडेच त्याचा प्रत्यय आल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण नाकारले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहिलो, तर पोलीस आता पाकिटमारीचा गुन्हाही नोंदवतील, त्यामुळे ठाण्यातील कार्यक्रमाला जाणे टाळत असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.
( हेही वाचा : दादरमधील बाहेरच्या फेरीवाल्यांविरोधात भाजप आक्रमक)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे पालिकेतील अनेक योजनांचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जितेंद्र आव्हाड यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला आपण येणार नसल्याचे त्यांनी ट्वीट करीत कळवले. या ट्वीटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोलाही लगावला आहे.
‘आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचा शुभारंभ होणार आहे. महापालिकेने मला त्याचे आमंत्रण दिले आहे. पण, ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर असताना माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः त्याचे साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बरे. परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहे ना, मी हे करू शकत नाही. तुला कस कळत नाही. खरच कळत नाही. चलो ये वक्त भी गुजर जयेगा’, असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.
आव्हाड का नरमले?
काही दिवसांपूर्वी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यानंतर आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना एक रात्र तुरुंगातही काढावी लागली होती. त्यामुळे मोठा राडाही झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आव्हाड आता चांगलेच सावध झाल्याचे पाहिला मिळत आहेत.
Join Our WhatsApp Community