मंगळ ग्रह ८ डिसेंबरला अगदी सूर्यासमोर येणार आहे. मंगळाविषयी समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत. मात्र, ही एक खगोलीय घटना आहे. खगोलप्रेमींना साध्या डोळ्याने हा ग्रह पाहता येईल व लाल रंगाचा असल्याने सहजतेने ओळखता येणार असल्याचे मराठी विज्ञान परिषदेने सांगितले.
खगोलशास्त्रात या घटनेला ‘प्रतियुती’ म्हणतात. पृथ्वी व मंगळ हे अंतर कमी असल्याने या ग्रहाचा खगोल अभ्यासकांना चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो. पृथ्वी व मंगळ हे अंतर सरासरी १३ कोटी ६८ लाख ६७ हजार ६५० किलोमीटर आहे. मात्र, प्रतियुती दरम्यान हे अंतर सरासरी कमी होते. २६ महिन्यांनी सूर्य-मंगळ प्रतियुती असते. यापूर्वी १३ ऑक्टोबर २०२० रोजी ही प्रतियुती झाली होती.
विज्ञान युगातसुद्धा मंगळाविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत. मात्र, या ग्रहाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. ८ डिसेंबरला सूर्य मावळल्यानंतर लगेच मंगळ हा ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी हा ग्रह पाहता येणार आहे. कर्मकांडाच्या मागे न लागता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या विलोभनीय घटनेचे निरीक्षण करून आनंद घेण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेने केले आहे.
मंगळ ग्रह लाल रंगाचा का?
मंगळ ग्रहावर आर्यन ऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्यामुळे नेहमी लाल दिसतो. या ग्रहाला दोन चंद्र आहेत. मंगळाचा व्यास ६,७९५ किमी आहे व या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरा मारण्यास ६८७ दिवस लागतात. २० जुलै व ३ सप्टेंबर १९७६ रोजी व्हायकिंग १ व २ या जुळ्या मानवरहित यानांनी मंगळाच्या मातीला प्रथम स्पर्श केला. या यानांनी जवळपास ११ महिन्यांचा प्रवास केला होता.
Join Our WhatsApp Community