पंजाबमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलांनी पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडला आहे. पंजाबमधल्या तरणतारण पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाईत हा क्वाडकाॅप्टर ड्रोन पाडला आहे. सुरक्षा दलांनी ड्रोनसह तीन किलो हेराॅईनदेखील जप्त केले आहे. सुरक्षा दलांनी 3 डिसेंबरला ही संयुक्त कारवाई केली आहे. डीजीपी पंजाब गौरव यादव यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11 वाजता भारत- पाकिस्तान सीमेवरील तरणतारण येथे ड्रोनची हालचाल दिसली. यावेळी 103 बटालियनचे सैनिक बाहेरील भागात तैनात होते. ड्रोनचा आवाज ऐकताच त्यांनी गोळीबार सुरु केला, त्यानंतर आवाज येणे बंद झाला. रात्री शोधमोहिमेत काहीही मिळाले नाही. सकाळी पुन्हा संपूर्ण परिसरात शोधमोहिम राबवण्यात आली, त्यात शेतात पडलेले ड्रोन सापडले. ड्रोनसोबत हेराॅईनची खेपही जप्त करण्यात आली आहे. ही हेराॅईन ड्रोनवर बांधण्यात आली होती.
येथेही पाडण्यात आले ड्रोन
याआधी सीमा सुरक्षा दलाने पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात शुक्रवारी रात्री एक ड्रोन पाडला होता. बीएसएफ आणि पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी सकाळी शोधमोहिम राबवली असता एका शेतातून पाच किलो हेराॅईन जप्त करण्यात आले. त्याची किंमत 25 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे हेराॅईन पाकिस्तानकडून पाठवण्यात आले होते.