मुलुंड-गोरेगांव लिंक रोडवरील नाहूर रेल्वे पुलाचे काम महापालिका आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून केले जात असून या पुलावरील गर्डर टाकण्याचे काम रविवारी रात्रीपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम रविवारी रात्री ११ वाजता हाती घेण्यात येणार असून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये नाहुर रेल्वे पुलावरील दोन्ही बाजुंची वाहतूक पुर्णपणे बंद राहणार आहे.
कोस्टल रोडप्रमाणे गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प हा महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा चौथा जोड रस्ता असून १२.२ कि.मी लांबीच्या या रस्ते प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून ४.७ कि.मी लांबीचा भूमिगत बोगदा आहे. या जोड रस्ता प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे का काम प्रगतीपथावर आहे. या पुलाचे रेल्वे हद्दीतील गर्डर टाकण्याचे रविवारी ४ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजल्यापासून ते सोमवारी ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत केले जाणार आहे. या गर्डरचे काम केले जाणार असल्याने नाहूर पुलावरील दोन्ही बाजू या कालावधीत बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे.
( हेही वाचा: घरपोच LPG गॅस सिलिंडरसाठी जास्तीचे पैसे मागितले जातायत? अशी करा तक्रार )
ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी या पुलाच्या गर्डरचे काम केले जाणार असल्याने वाहतुकीसाठी हे पूल रविवारी रात्री अकरा वाजल्यापासून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असल्याने नागरिकांनी या कालावधीत या पुलावरुन वाहतूक करणे टाळावे, असे आवाहन केले आहे, शिवाय येत्या १५ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने आणखी एकदा अशाप्रकारे बंद केले जाणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे प्रशासन आणि महापालिकेला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन कोटक यांनी केले आहे.
या पर्यायी मार्गांचा करा वापर
- नाहुर रेल्वे पुलावरून पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहने ही लाल बहादूर शास्त्री मार्गाने जटा शंकर डोसा पुलाने पूर्व द्रुतगती महामार्गाकडे मार्गस्थ व्हावे.
- पूर्व द्रुतगती महामार्ग व ऐरोलीने मुलुंड पश्चिमकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही नवघर जंक्शनकडून जटा शंकर डोसा ब्रिजने ला. ब. शा. मार्गाने जातील. तसेच ऐरोलीने भांडूप पश्चिमकडे जाणारी वाहतूक ही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडने गांधीनगर जंक्शनने लाल बहादूर शास्त्री मार्गाने जातील.