चंद्रपूरात वाघांच्या वाढत्या हल्ल्याच्या घटना पाहता जेरबंद केलेल्या प्राण्यांना पिंज-याची जागा अपुरी पडू लागली आहे. ऑक्टोबर महिन्यांपासून वाघांचे वाढते हल्ले पाहता दोन वाघांना वनाधिका-यांनी पकडले आहे. या दोन्ही वाघांची रवानगी लवकरच बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केली जाईल. उद्यानातील दुर्गा आणि बजरंग या दोन वाघ-वाघीणीला गुजरातला पाठवल्यानंतर या दोन वाघांना उद्यानातील पिंज-यात पाठवले जाईल. या वाघांना श्रीवल्ली वाघीणीचा साथीदार होण्याची संधी आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून चंद्रपूरात वाघांचे हल्ले वाढत असल्याच्या नोंदी आहेत. आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोन किंवा तीन माणसांचा बळी गेल्याच्या घटनांची नोंद आहे. वाघांना पकडायचा निर्णय ठाम असला तरीही जेरबंद वाघांना ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न वनविभागासमोर आहे. चंद्रपूरात महिन्याभरातच के४ आणि पी२ हे अंदाजे दोन ते तीन वर्षांचे वाघ वनाधिका-यांनी जेरबंद केले. त्यापैकी पीर या वाघाने ऑक्टोबर महिन्यापासून चंद्रपूरात तीन माणसांवर हल्ला केला. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. गडचिरोलीत माणसावर झालेल्या हल्ल्यातही पी२ वाघाचा समावेश असावा, असा वनाधिका-यांचा अंदाज आहे. शनिवारी त्याला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत बेशुद्ध करुन पकडण्यात आले. पी२ नर वाघाची बहिण आणि आईचाही एकाच भागात वावर होता. अशातच बेशुद्ध केलेल्या पी२ ला पकडताना त्याच्या आई किंवा बहिणीकडूनही वनाधिका-यांवर हल्ला होण्याची शक्यता होती. जंगलात पी२ वाघ पकडण्याची मोहिम राबवणे अत्यंत आव्हानात्मक असल्याचे वनाधिकारी सांगतात. के४ आणि पी २ हे दोन्ही वाघ सध्या चंद्रपूरात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत. परंतु जागेच्या अभावी त्यांना लवकरच दुसरीकडे पाठवणे गरजेचे आहे. अशातच बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दोन वाघांची रवानगी गुजरातला केल्यानंतर त्यांचा रिकाम्या पिंज-यात के४ आणि पी२ वाघ ठेवले जातील. या वाघांना मुंबईत घेऊन आणण्यासाठी उद्यानातील वनाधिका-यांची टीम लवकरच चंद्रपूरात जाणार आहे. या बातमीला मात्र वनाधिका-यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
( हेही वाचा: नाहुर पूल रविवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद… )
Join Our WhatsApp Community