परळमधील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मेंदूच्या आजारावर विशेषतः पक्षाघातवर उपचार करण्यासाठी मशिन उपलब्ध करून सर्वसामान्यांवर वैद्यकीय उपचार करण्याची सुविधा पुरवण्यात आली. या मशिनद्वार केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचाराचा चांगल्याप्रकारे रुग्णांना फायदा होत असल्याने आता पूर्व उपनगरांतील राजावाडी रुग्णालय तसेच पश्चिम उपनगरांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय अर्थात कांदिवली शताब्दी रुग्णालय आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या भांडुप स्पेशालिटी रुग्णालयात या मशिन्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजावाडी आणि कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लवकरच ही सुविधा उपलब्ध होऊन मेंदुचा आजार झालेल्या रुग्णाचा जीव गोल्डन अवर्समध्ये वाचवणे शक्य होणार आहे.
(हेही वाचा – गर्भवती गायीच्या पोटातून काढल्या तब्बल ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या!)
मुंबई महापालिकेच्या केईएम इस्पितळात सन २०१८मध्ये न्युरो मशिन उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे मेंदूचे आजार विशेषतः पक्षाघात या आजारात विशिष्ट वेळेत रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यास त्या मशीनद्वारे उपचार झाल्यास रुग्ण पूर्णतः बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. परंतु मुंबई उपनगरात रहाणाऱ्या नागरिकांना बहुतेक वेळा या कमीत कमी वेळेत म्हणजेच गोल्डन अवर्समध्ये केईम रुग्णालयात पोहोचणे शक्य होत नाही.
ही बाब लक्षात घेता मुंबई उपनगरात आरोग्यव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून विलेपार्ले येथील भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी २२ जुलै २०२२ रोजी ‘जागतिक ब्रेन डे’ च्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल ह्यांच्याकडे अशा प्रकारची मशीन मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरातील रुग्णालयातही उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती.
या मागणीवर सकारात्मक विचार आता महापालिका प्रशासनाने घेतला असून मुंबई पूर्व उपनगरात राजावाडी रुग्णालय व नव्याने बांधण्यात येत असलेले भांडुप मल्टी स्पेशालिटी रुग्णालय तसेच पश्चिम उपनगरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (कांदिवली शताब्दी) येथे अशा प्रकारची प्रत्येकी एक मशीन उपलब्ध करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ विद्या ठाकूर यांनी अभिजित सामंत यांना लेखी स्वरुपात कळवले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापालिका आयुक्त यांनी ही मागणी रास्त मानून या मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने आता उपनगरातील मेंदूच्या विकारावरील रुग्णांना वेळेत उपचार मिळून ते आजार मुक्त होतील,असा विश्वास व्यक्त करत अभिजित सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापालिका आयुक्तांचे हृदयपूर्वक आभार मानले आहेत.
Join Our WhatsApp Community