इराक देशाचा अध्यक्ष सद्दाम हुसेन हा आपल्या राजकीय विरोधकाला ठार करण्यासाठी ज्या थेलियम या विषारी धातूचा वापर करीत होता, त्याच विषारी धातूचा वापर सांताक्रूझ येथील व्यवसायिक कमलकांत शहा यांच्या हत्येसाठी करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण
दिल्ली येथे २०२१ मध्ये एका व्यवसायिकाने थेलियम हा विषारी धातू पत्नी आणि सासू सासऱ्याच्या जेवणात देऊन त्यांची हत्या केली होती. त्याने इराक देशाचा अध्यक्ष सद्दाम हुसेन याने केलेल्या कृत्याची कथा इंटरनेटवर वाचली होती आणि थेलियम या विषारी धातूचा वापर केला होता. सांताक्रूझ पश्चिम येथील व्यवसायिक कमलकांत शहा यांना ठार करण्यासाठी त्याची पत्नी कविता उर्फ काजल आणि तिचा प्रियकर हितेश जैन हा देखील मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर विषारी द्रव्याचा शोध घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना असाही संशय आहे की, आरोपी हितेश जैन याच्या देखील वाचनात सद्दाम हुसेन आणि २०२१ मध्ये घडलेल्या घटनेचे वृत्त इंटरनेटवर वाचली असावे, व त्यातून प्रेरित होऊन त्याने कमलकांत याच्या हत्येसाठी थेलीयम आणि आर्सेनीक या विषारी धातूचा वापर केला असावा असा संशय तपास अधिकारी यांना असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. सांताक्रूझ पश्चिमेत राहणारे व्यवसायिक कमलकांत शहा यांच्या पोटात २४ ऑगस्ट रोजी अचानक दुखू लागले व त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या रक्ताच्या तपासणीत त्याच्या रक्तात आर्सेनिक आणि थेलियम हे विषारी धातूचे प्रमाण मोठया प्रमाणात आढळून आले. हळूहळू या विषारी धातूने कमलकांत यांच्या शरीरातील सर्व अवयव निकामी केले व अखेर १९ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – ‘मनसे’च्या नाराज वसंत मोरेंना पवारांकडून ऑफर; म्हणाले, ‘…वाट पाहतोय’)
मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने कमलकांत शहा यांच्या बहिणीच्या तक्रारी वरून तपास करून कमलकांत यांची पत्नी कविता उर्फ काजल आणि तिचा प्रियकर व कमलकांत यांचा बालपणीचा मित्र हितेश जैन या दोघांनी मिळून हा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी १ डिसेंबर रोजी कक्ष ९ च्या पथकाने हितेश जैन आणि कविता उर्फ काजल यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीत त्यांनी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता अशी माहिती समोर आली आहे. हे विष सद्दाम हुसेन आपल्या राजकीय विरोधकांना देत होता.