आत्मक्लेश आंदोलनाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात ‘ट्विटरवॉर’ रंगले असून, यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त व्यक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आत्मक्लेश आंदोलन पुकारले. छत्रपती संभाजीमहाराजांच्या श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर, जि. पुणे) येथील समाधीस्थळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मौन धरून हे आंदोलन केले. त्यात आठ आमदार आणि स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले. परंतु, राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे या आंदोलनाला गैरहजर राहिल्याने त्याची मोठी चर्चा रंगली.
(हेही वाचा – ‘मनसे’च्या नाराज वसंत मोरेंना पवारांकडून ऑफर; म्हणाले, ‘…वाट पाहतोय’)
याउलट आत्मक्लेश आंदोलनाला दांडी मारणाऱ्या कोल्हे यांनी त्याच दिवशी केंद्रीय मंत्री भागवत कराड याची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. रोहित पवार यांनी ही बाब शरद पवार यांच्या कानावर घातली. त्यामुळे नाराज झालेल्या कोल्हे यांनी थेट सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला.
काय म्हणाले कोल्हे?
‘आत्मक्लेश पेक्षा ठसा उमटवण्याला आणि छत्रपतींचे महत्व अधोरेखित करण्याला माझे प्राधान्य!. काल वढू-तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे मी उपस्थित नव्हतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या “शिवपूत्र संभाजी” महानाट्यासंदर्भात माननीय केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय डॉ. भागवतजी कराड यांची भेट घेऊन चर्चा केली’. मतदारसंघातील “आत्मक्लेश” साठी अनुपस्थित असल्याने उगाच चर्चा करण्याची गरज नाही. कारण, शिवसिंहाच्या छाव्याने ‘आत्मक्लेश’ वगैरे बाबींपेक्षा झेपावण्याला आणि ठसा उमटवण्यालाच महत्व दिलं असतं. त्याच आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न आहे!’, असे ट्विट करीत कोल्हे यांनी रोहित पवारांविरोधात रोष व्यक्त केला.
रोहित पवार यांचे प्रत्युत्तर
प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत असते. त्यानुसारच गेल्या काही दिवसांपासून आपल्याला ऐकाव्या लागत असलेल्या अवमानकारक भाषेमुळं दुःख झाल्याने आत्मक्लेश आंदोलन केलं.या आंदोलनाची माहिती एक दिवस आधीच सोशल मीडियातून दिली होती आणि त्यासाठी आलेले सर्वच लोक हे स्वयंस्फूर्तीने आले होते, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिले.
Join Our WhatsApp Community