१७ डिसेंबरला राज्यपालांविरोधात महाविकास आघाडी काढणार विराट मोर्चा

159

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. महाविकास आघाडीही या मुद्द्यावर आक्रमक झाली असून, येत्या १७ डिसेंबरला मुंबई विराट मोर्चा काढला जाणार आहे.

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी झालेल्या मविआच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, भाई जगताप, मिलिंद नार्वेकर आदि या बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा …तर गड-किल्ल्यांवरही वक्फ कब्जा करेल!)

बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व अन्य महापुरुषांविषयी सातत्याने केलेली बेताल वक्तव्ये, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रद्रोही विधाने, सीमाप्रश्न, इतर राज्यामध्ये सहभागी होण्यासाठीच्या कटकारस्थानास राज्य सरकारची असलेली फुस, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची महिला आणि अन्य नेत्यांविषयीची बेताल वक्तव्ये यासंदर्भात आवाज उठवण्यासाठी १७ डिसेंबरला ११ वाजता वीरमाता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान भव्य मोर्चा काढला जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत, सपा, शेकाप आणि अन्य घटकपक्ष सहभागी होतील. शिवाय सर्वसामान्य नागरिकांनीही या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्राची शक्ती दाखवून द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यपालांना हटवले तरी मोर्चा काढणार

महाविकास आघाडीच्या विराट मोर्चासंदर्भात ८ तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. त्यात समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्षासह समविचारी पक्षाचे नेते सहभागी होतील. या मुदतीच्या आत राज्यपालांना हटवले, तरीही मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.