डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट नोंदवली जात आहे. साप्ताहिक अहवाल नोंदीनुसार आता कोरोनामध्ये ३७.७९ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. कोरोना स्थानिक होत चालल्याने त्याची तीव्रता घटत इतर आजारांप्रमाणेच त्याची थोडीफार नोंद होतच राहील, मात्र कोरोनाचा प्रसार घटल्याचे आरोग्य विभागाने सोमवारी स्पष्ट केले. जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ तसेच वर्धा, भंडारा आणि गडचिरोली हे बारा जिल्हे आता कोरोनामुक्त झाले आहे.
( हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत )
राज्यात तिस-या लाटेनंतर एक्सबीबी व्हेरिएंट दिसून आला. आतापर्यंत राज्यात मुंबईत (७२), पुण्यात (७७), ठाण्यात (२६), नागपूर, कोल्हापूरात प्रत्येकी तीन, भंडा-यात दोन, अकोला, अमरावती आणि रायगड जिल्ह्यांत प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. एक्सबीबी व्हेरिएंट दिसून आलेल्या भागांत कोरोनाचा प्रसार आणि तीव्रता वाढली नाही, असेही निरीक्षण आरोग्य विभागाकडून नोंदवण्यात आले. रुग्णसंख्येत कमालीची घट सुरु असून केवळ पुण्यात सध्या शंभर सक्रीय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या दिसून आली आहे. पुण्याखालोखाल ठाण्यात (५२) तर मुंबईत (४८) सक्रीय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आरोग्य विभागाचा निष्कर्ष
- राज्य आरोग्य विभागाने २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर तसेच २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत दैनंदिन कोरोना रुग्णांच्या नोंदीचे निरीक्षण नोंदवले. प्रत्येक आठवड्यात दैनंदिन नव्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३७.७९ टक्के घट दिसून आली आहे. तर गेल्या आठवड्यात केवळ एकाच रुग्णाचा कोरोनामुळे बळी गेला.
- रुग्णालयात भरती होणा-या तसेच अतिदक्षता विभागात दाखल होणा-या रुग्णांमध्ये प्रचंड वेगाने घट दिसून येत आहे.
- पुणे, कोल्हापूर, जालना, बुलडाणा आणि औरंगाबादमध्ये साप्ताहिक कोरोना केसेस सापडण्याचा दर १ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.